मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ सप्टेंबर २०२४
मुंबई, – मोलकरणीने कामासाठी पाठविले आहे असे सांगून घरात प्रवेश केलेल्या एका महिलेने वयोवृद्धाच्या घरात हातसफाई केली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी महिलेस विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. शीतल अरुण उपाध्याय असे या महिलेचे नाव असून अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले आहे. शीतलने कामाचा बहाणा करुन कपाटातील सोन्याचे दागिने आणि चार हजार रुपयांची कॅश असा ३ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल चोरी केला होता. चोरीचा हा मुद्देमाल लवकरच हस्तगत करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सविता श्रीपाल जैन ही ७८ वर्षांची महिला विलेपार्ले येथील आझाद रोड, राजतारा अपार्टमेंटमध्ये राहते. तिचा विवाहीत मुलगा गोरेगाव येथे त्याच्या कुटुंबियासोबत राहत असून त्याचे इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दुकान आहे. २१ सप्टेंबरला दुपारी दिड वाजता ती तिच्या मुलांसोबत मरिनलाईन्स येथे कपडे खरेदीसाठी गेली होती. यावेळी तिचे पती श्रीपाल जैन हे घरी होते. सायंकाळी साडेपाच वाजता ते सर्वजण घरी आले. यावेळी त्यांना घरातील दरवाजा उघडा दिसला तर तिचे पती बेडरुममध्ये आराम करत होते. लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा होता. तिने आतील सामानाची पाहणी केली असता कपाटातून चार हजाराची कॅशसहीत ३ लाख ६८ हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यामुळे तिने तिच्या पतीला विचारणा केली होती. यावेळी त्यांनी एक महिला घरी आली होती. त्यांची मोलकरीण कामावर येणार नसल्याने तिने तिला कामासाठी घरी पाठविले होते. काम करुन ती निघून गेल्याचे सागितले. याच महिलेने कामाचा बहाणा करुन त्यांच्या घरात प्रवेश करुन कपाटातील सोन्याचे दागिने आणि कॅशची चोरी करुन पलायन केले होते.
हा प्रकार लक्षात येताच तिने विलेपार्ले पोलिसांना ही माहिती सांगितली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या महिलेचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी शीतल उपाध्याय या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिनेच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.