पोलीस ठाण्यातून घरफोडीच्या गुन्ह्यांतील आरोपीचे पलायन
गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपीला काही तासांत अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
27 नोव्हेंबर 2025
मुंबई, – विलेपार्ले पोलीस ठाण्यातून घरफोडीच्या गुन्ह्यांत अटक केलेल्या एका आरोपीने पलायन केल्याने तिथे उपस्थित पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली होती. इम्रान इस्तियाक अन्सारी ऊर्फ यश डाकोरे असे या 28 वर्षीय आरोपीचे नाव आहे. पळून गेलेल्या इम्रानला गुन्हा दाखल होण्यापूर्वीच विलेपार्ले पोलिसांच्या एका विशेष पथकाने टर्मिनस नऊ इमारतमधील हायड्रोनिक पार्किंगमधून शिताफीने अटक केली. कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी इम्रानविरुद्ध अन्य एका गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून याच गुन्ह्यांत दुसर्या दिवशी त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
नरेश चंदर कुरबुडे हे अंधेरीतील सहार रोड, ओल्ड पोलीस वसाहतीत राहत असून सध्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वी विलेपार्ले येथे एका घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. या गुन्हयांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन मांडोळे यांच्याकडे होता. या गुन्ह्यांचा तपासादरम्यान या गुन्ह्यांत इमान अन्सारीचा सहभाग उघडकीस आला होता. इम्रान हा नालासोपारा येथील धानीव बाग, पंकज पाटील चाळीत राहत असून घरफोडीच्या गुन्ह्यांतील तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. त्याचा शोध सुरु असताना इम्रानला मेघवाडी पोलिसांनी अशाच एका घरफोडीच्या गुन्ह्यांत अटक केल्याची तसेच तो सध्या आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.
या माहितीनंतर विलेपार्ले पोलिसांनी अंधेरीतील लोकल कोर्टात अर्ज करुन इम्रानचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला होता. या अर्जानंतर कोर्टाने पोलिसांना इम्रानचा ताबा घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आर्थर जेलमधून ताब्यात घेऊन त्याला घरफोडीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला वैद्यकीय मेमो आणि लॉकअपमध्ये ठेवण्यासाठी प्रथम चौकशी पथकाच्या कक्षेत ठेवण्यात आले होते. सायंकाळी साडेपाच वाजता त्याला अॅम्बिस प्रणालीवर फिंगरप्रिट घेण्यासाठी सीसीटिव्ही नियंत्रण कक्षात आणण्यात आले होते. तिथे असताना तो पोलिसांना चकवून पोलीस ठाण्यातून पळून गेला होता.
हा प्रकार तिथे उपस्थित पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पोलीस ठाण्यातून आरोपी पळून गेल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते.
या माहितीनंतर पोलीस निरीक्षक सतीश इंगळे, श्रीनिवास चेवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कदम, अविनाश राक्षे, पोलीस शिपाई नितीन साळुंके, जितेंद्र ठाकरे भानुदास महाजन, निलेश किरवे, पोलीस हवालदार अनुरथ रणपिसे, मंगळदास पाडावे, किरण शिंदे, बारकू बांगर, अतुल कापसे, सहाय्यक फौजदार जंगम आदीचे दोन ते तीन पथक नेमण्यात आले होते.या पथकाने आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रात्री नऊ वाजता इम्रान अन्सारीला टर्मिनस नऊ इमारतमधील हायड्रोनिक पार्किंगमधून पोलिसांनी शिताफीने अटक केली.
पोलीस ठाण्यातून पळून गेल्यानंतर तो हायड्रोनिक पार्किंगमध्ये आला होता. तेथील एका कोपर्यात तो लपवून बसला होता. यावेळी त्याला पोलीस शिपाई विशाल आईर यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी त्याला इतर पोलिसांच्या मदतीने अटक केली. रात्री उशिरा तो तेथून पळून जाणार होता, मात्र त्यापूर्वीच त्याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी नरेश कुरबुडे यांच्या तक्रारीवरुन इम्रानविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.