डिलीव्हरीसाठी दिलेल्या 39 लाखांचा दागिन्यांचा अपहार

कुरिअर कंपनीच्या डिलीव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
25 डिसेंबर 2025
मुंबई, – डिलीव्हरीसाठी दिलेल्या सुमारे 39 लाख रुपयांच्या सोन्यासह हिर्‍यांचा दागिन्यांचा कंपनीच्या डिलीव्हरी बॉयने अपहार केल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी रितीककुमार कैलाचंद्र या आरोपी डिलीव्हरी बॉयविरुद्ध विलेपार्ले पोलिसांनी दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दागिने घेऊन तो त्याच्या राजस्थानातील गावी पळून गेल्याची शक्यता असल्याने तिथे एक टिम पाठविण्यात येणार आहे.

महेंद्र भोजराज पचार हे विलेपार्ले येथे राहत असून त्यांची स्वतची एक कुरिअर कंपनी आहे. काळबादेवीतील विठ्ठलवाडी, नारायण निवास विठोबा लेनवर त्यांची जे. एम. डी एक्सप्रेस लॉजिस्टिक नावाची कुरिअर कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात येणारे विविध साहित्यासह सोन्या-चांदीचे आणि हिर्‍यांचे दागिने संबंधित व्यक्तींना डिलीव्हरी करण्याचे काम चालते. त्यासाठी कंपनीत काही डिलीव्हरी बॉयची नियुक्ती करण्यात आली आहे. अनेकदा डिलीव्हरी बॉयला विदेशात येणारे साहित्य जमा करणे आणि त्यांना डिलीव्हरीसाठी परस्पर पाठविले जाते. या कर्मचार्‍यांसाठी त्यांनी विलेपार्ले येथील एन. पी ठक्कर रोड, सोनाली इमारतीमध्ये एक स्टाफ रुम घेतला होता. तिथेच त्यांच्या कंपनीत काम करणारे डिलीव्हरी बॉय राहत होते.

20 डिसेंबरला वसई येथील हर्ष इंपेक्स कंपनीचे एक पार्सल आले होते. ते पार्सल झव्हेरी बाजार येथील धनजी स्ट्रिटवरील रुल्स डायमंड शॉपमध्ये पाठविण्यासाठी देण्यात आले होते. या पार्सलमध्ये 151 ग्रॅम वजनाचे सोन्याचे आणि हिर्‍यांचे दागिने होते. ते पार्सल कंपनीने त्यांच्याकडे आणून दिले. त्याच दिवशी ते पार्सल डिलीव्हरीसाठी रितीककुमारला देण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे रितीककुमार डिलीव्हरीचे पार्सल आणि महेंद्र पाचार यांच्याकडून दहा हजार रुपये घेऊन त्याच्या विलेपार्ले येथील रुममध्ये आला होता. त्याला दुसर्‍या दिवशी ते पार्सल डिलीव्हरी करण्यास सांगण्यात आले होते. मात्र दुपारपर्यंत माय चेन्स ज्वेलर्सला त्यांचे पार्सल मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली होती.

हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी रितीककुमारला मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे दोन्ही मोबाईल बंद होते. त्याचा काहीच संपर्क होत नव्हता. त्याला 39 लाख 63 हजार 580 रुपयांचे विविध सोन्याचे, हिर्‍याचे दागिने डिलीव्हरीसाठी दिले जाते, मात्र तिथे न जाता तो सोन्याचे आणि हिर्‍याचे दागिने घेऊन पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विलेपार्ले पोलीस ठाण्यात रितीककुमारविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी कंपनीच्या डिलीव्हरी बॉय असलेल्या रितीककुमारविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. तपासात रितीककुमार हा मूळचा राजस्थानच्या झुझून, नवलगढ, नायको का मोहल्लाचा रहिवाशी आहे. दागिने घेऊन तो त्याच्या गावी पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम लवकरच राजस्थानात जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page