रॉबरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड महिलेसह दोघांना अटक
वयोवृद्धेसह मोलकरणीचे हातपाय बांधून रॉबरी केली होती
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१० जानेवारी २०२४
मुंबई, – घरात कोणीही नसल्याची संधी साधून घरात प्रवेश करुन एका वयोवृद्ध महिलेसह तिच्या मोलकरणीचे हातपाय बांधून कपाटातील विविध सोन्याचे दागिने आणि कॅश असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पळून गेलेल्या दोन्ही वॉण्टेड आरोपींना गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. बाबू आनंद सिंदल आणि श्वेता जयेश लडगे अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. यातील बाबू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध वर्सोवा पोलीस ठाण्यात फसवणुकीची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दत्ताराम गोपाळ डिचवळकर हे ६० वर्षांचे प्रॉपटी एजंट त्यांच्या कुटुंबियांसोबत विलेपार्ले येथील सुभाष रोड, समर्थ निवास इमारतीच्या तळमजल्यावर राहतात. त्यांची आई वयोवृद्ध असल्याने तिचा सांभाळ करण्यासाठी त्यांची मोलकरीण त्यांच्यासोबत राहत होती. तिला ऐकण्यास कमी येते तर तिला स्पष्ट बोलता येत नाही. रविवारी ५ जानेवारीला त्यांच्या मुलीकडे कार्यक्रम असल्याने ते विलेपार्ले येथे कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या घरात त्यांची आई राधाबाई (८५) आणि मोलकरीण संगीता सुभाष काळकर (४४) या दोघीच होत्या. दुपारी त्यांच्या घरात दोन तरुणांनी प्रवेश करुन त्यांच्या आईसह मोलकरणीचे हातपाय बांधून, तोंडाला सेलोटेप लावून कपाटातील लॉक तोडून ड्राव्हरमधील विविध सोन्याचे दागिने आणि १ लाख ५ हजार रुपयांच्या पाचशे रुपयांच्या नोटा असा ७ लाख ८५ हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर उघडकीस येताच दत्ताराम डिचवळकर यांनी विलेपार्ले पोलिसांना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी रॉबरीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला होता.
या घटनेची पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, मधफकर धुतराज, उत्कर्ष वझे, संगाम पाटील, राहुल प्रभू, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, जयेंद्र कानडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बनसोडे, पोलीस हवालदार यादव, किणी, काकडे, कुरकुटे, सावंत, कांबळे, सकट, रहेरे, सटाले, महिला पोलीस शिपाई गायकवाड, भिताडे, पोलीस शिपाई बिडवे, साळवे, होळंबे, भूमकर, पोलीस हवालदार कामत, पोलीस शिपाई डवंग यांनी तपास सुरु केला होता.
सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु असताना आरोपी मुंबईतून पळून गेल्याचे पोलिसांना समजले होते. या गुन्ह्यांत एका महिलेचा सहभाग उघडकीस आला होता. त्यामुळे अंधेरीतील वर्सोवा परिसरात राहणार्या श्वेताला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने बाबू सिंदल याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर बाबूला ठाणे येथून पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून पोलिसांनी चोरीचा काही मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर या दोघांनाही पुढील तपासासाठी विलेपार्ले पोलिसांच्या स्वाधीन देण्यात आले होते. अटकेनंतर या दोघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. बाबू याच्याविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.