मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 मार्च 2026
मुंबई, – विलेपार्ले आणि कांदिवलीतील दोन वेगवेगळ्या अपघाताताच्या घटनेत एका तरुणासह दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये निलकंठ विजय इंगाले आणि टुवनकुमार महेश्वर यादव यांचा समावेश आहे. याप्रकरणी चारकोप आणि विलेपार्ले पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोन आरोपींना चारकोप पोलिसांनी अटक केली. त्यात वाहनचालक आफ्ताफ आलम आणि टँकरचालक आनंतराय शिवनायक यादव यांचा समावेश आहे तर विलेपार्ले येथील अपघातानंतर पळून गेलेल्या अज्ञात वाहनचालकाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
पहिला अपघात मंगळवारी 24 मार्चला रात्री साडेअकरा वाजता विलेपार्ले येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, सेंटाँर ब्रिज उतरणीच्या साऊथ बाँण्डवर झाला. खुशबू धनाराज वानखेडे ही महिला अंधेरी परिसरात राहत असून निलकंठ हा तिचा लहान भाऊ आहे. त्याचे आर्या या तरुणीसोबत प्रेमविवाह झाला होता. तीन महिन्यापूर्वीच त्यांना एक मुलगा झाला होता. त्यामुळे आर्या ही तिच्या माटुंगा येथील माहेरी राहत होती. निलकंठ हा तिला अधूनमधून भेटण्यासाठी जात होता. मंगळवारी तो नेहमीप्रमाणे त्याच्या पत्नीसह मुलाला भेटण्यासाठी माटुंगा येथे गेला होता. त्यांना भेटून तो रात्री त्याच्या बाईकवरुन अंधेरीतील घरी येत होता.
ही बाईक सेट्राँर ब्रिजजवळ येताच भरेवगता जाणार्या एका अज्ञात वाहन चालकाने त्याच्या बाईकला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघाताची माहिती मिळताच विलेपार्ले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघातात जखमी झालेल्या निलकंठला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. याप्रकरणी खुशबू वानखेडे हिच्या तक्रार अर्जावरुन पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. अपघातानंतर आरोपी चालक निलकंठला कुठलीही वैद्यकीय मदत किंवा पोलिसांना अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
या अपघाताची घटना ताजी असताना बुधवारी सायंकाळी सहा ते सात वाजता दुसरा अपघात कांदिवलीतील चारकोप, कांदिवली मेट्रो स्टेशनजवळील चारकोप पेट्रोलियमसमोरील रस्त्यावर झाला. चंदनकुमार महेश्वर यादव हा मूळचा बिहारचा रहिवाशी असून सध्या कांदिवलीतील गणेशनगर, जनता कॉलनी परिसरात राहतो. 31 वर्षांचा टुवनकुमार हा त्याचा मोठा भाऊ असून तो डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. बुधवारी सायंकाळी तो कामावर निघून गेला होता. सायंकाळी सात वाजता तो कांदिवली मेट्रो स्टेशनजवळील चारकोप पेट्रोलियमसमोरील रस्त्यावरुन डिलीव्हरीसाठी जात होता. यावेळी तिथे एका व्यक्तीने त्याची कार पार्क केली होती. टुवनकुमार जात असताना त्याने कारचा दरवाजा उघडला, त्यामुळे तो खाल पडला आणि मागून जाणार्या एका टँकरच्या चाकाखाली आला होता.
त्याच्या डोक्यावरुन चाक गेल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. जखमी झालेल्या टुवनकुमारला स्थानिक लोकांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच चारकोप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी टँकरचालक आनंतराय शिवनायक यादव आणि कारचालक आफ्ताफ आलम याच्याविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवून त्यांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर या दोघांनाही नोटीस देऊन सोडून देण्यात आले होते.