मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विलेपार्ले येथील प्रसिद्ध कालिमाता शितलादेवी मंदिरात शनिवारी सकाळी झालेल्या चोरीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची उसळली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या सुनिल बोहत याला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली. चोरीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
साहिल धर्मेंद्र बोहत हा विलेपार्ले परिसरात राहत असून लोअर परेल येथील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्यांच्या घराजवळ कालिमाता शितलादेवी मंदिर असून त्याच्यासह त्याचे वडिल मंदिराची देखभाल करतात. मंदिराला दरवाजा नसून ते मंदिर भाविकासाठी २४ तासांसाठी खुले असते. शनिवारी सकाळी आठ वाजता साहिल हा घरी होता. यावेळी त्याच परिसरात राहणारा पप्पू सारवण याने त्याला मंदिरात चोरी झाल्याचे सांगितले. याच परिसरात राहणारा सुनिल बोहत हा दारुच्या नशेत मंदिरात आला आणि त्याने मंदिरातील सीसीटिव्ही कॅमेर्यासह डीव्हीआर, दानपेटीतील कॅश असा सुमारे तेरा हजाराचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याचे सांगितले. त्यामुळे साहिल तिथे गेला असता त्याला मंदिरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने विलेपार्ले पोलिसांत चोरीची तक्रार केली होती. या तक्रार अर्जात त्याने सुनिल बोहत याच्यावर संशय व्यक्त केला होता.
चोरीचा गुन्हा दाखल होताच आरोपीचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम असताना त्याला विलेपार्ले येथून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा काही मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.