व्हिला पॅलेस हॉटेलमध्ये चालणार्‍या हायफाय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

नोकरीच्या आमिषाने मुंबईत बोलावून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
27 फेब्रुवारी 2026
मुंबई, – अंधेरीतील हॉटेल व्हिला पॅलेसमध्ये विदेशी महिलांच्या मदतीने चालणार्‍या एका हायफाय सेक्स रॅकेटचा सहार पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी हॉटेलच्या मॅनेजरसह तीन हाऊसकिपिंग कर्मचारी अशा चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. विवेककुमार वैद्यनाथ यादव, अनिलकुमार जोकू पुष्पाकर आणि धीरज मधुकर जांबळे आणि महेश राजपाल राजबरीया अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी युगांडा नागरिक असलेल्या दोन महिलांची सुटका केली असून या दोन्ही महिलांना मेडीकलनंतर महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या गुन्ह्यांत हॉटेलचा मालक अक्षय दिलीप शेडगे आणि जास्मीन या दोघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

अंधेरीतील ए. के रोडवर व्हिला पॅलेस नावाचे एक हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये काही विदेशी महिला वास्तव्यास असून त्यांना विदेशातून भारतात नोकरीच्या आमिषाने बोलावून त्यांना जबदस्तीने वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले जात आहे. या सेक्स रॅकेटचा हॉटेलचा मालक अक्षय शेडगे आणि केनियन नागरिक असलेली एक महिला जास्मीन हे मुख्य आरोपी असल्याची माहिती सहार पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी एका बोगस ग्राहकाच्या मदतीने संबंधित आरोपींना संपर्क साधला होता. त्यांच्याकडे विदेशी महिलांची मागणी करण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे आरोपींनी बोगस ग्राहकाला व्हिला पॅलेसमध्ये बोलाविले होते.

बुधवारी दुपारी साडेतीन वाजता तिथे बोगस ग्राहक गेला होता. यावेळी हॉटेलमधील मॅनेजरसह कर्मचार्‍यांनी त्यांना युगांडा देशातील नागरिक असलेल्या दोन महिलांशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर त्यांच्यात पैशांचा व्यवहार सुरु असताना पोलिसांनी तिथे छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी हॉटेलचा मॅनेजर विवेककुमार यादव, हाऊसकिपिंग कर्मचारी अनिलकुमार पुष्पाकर, धीरज जावळे आणि महेश राजवरिया या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत त्यांनी अक्षय शेडगे आणि जास्मीन यांच्या मदतीने हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरु केल्याचे तपासात उघडकीस आले होते.

या कारवाईत पोलिसांनी दोन्ही विदेशी महिलांची सुटका केली. त्यांच्या चौकशीत त्या दोघीही युगांडा देशाच्या नागरिक असून त्यांना जास्मीन हिने भारतात काम देण्याचे आमिष दाखवून बोलावले होते. मुंबईत आल्यानंतर तिने त्यांची व्हिला पॅलेस हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. त्या हॉटेलबाहेर बाहेर पडू नये म्हणून तिने हॉटेलच्या कर्मचार्‍यांना सक्त ताकिद देऊन त्यांच्यावर पाळत ठेवली होती. विदेशी नागरिक असताना त्यांचे सी फॉर्म भरुन घेतले नव्हते. त्यांना कुठलीही नोकरी न देता तिने त्यांना सेक्स रॅकेटमध्ये आणले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या दोन्ही महिलांना मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नवजीवन महिला सुधारगृहात पाठविण्यात आले होते.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया पाटील यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हॉटेलचा मालक अक्षय शेडगे, विदेशी महिला जास्मीन, मॅनेजर विवेककुमार यादव, हाऊसकिपिंग कर्मचारी अनिलकुमार पुष्पाकर, धीरज जांबळे, महेश राजबरीया यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि पिटा कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर मॅनेजरसह तिन्ही कर्मचार्‍यांना पोलिसांनी अटक केली. अक्षय शेडगे आणि जास्मीन पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. अटक आरोपींपैकी विवेककुमार हा बिहार तर इतर तिन्ही कर्मचारी उत्तरप्रदेशचे रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page