प्रेयसीच्या आत्महत्येप्रकरणी प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल
वर्षभरात प्रेमाचा शेवट आत्महत्येने झाल्याने कुटुंबात शोककळा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 फेब्रुवारी 2026
वसई, – पालघरच्या एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणार्या एका 19 वर्षांच्या तरुणीने विरार रेल्वे स्थानकात लोकलखाली आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर एक महिन्यानंतर तिच्या प्रियकराविरुद्ध वसई पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आदित्य रविंद्र पवार असे या आरोपी प्रियकराचे नाव असून तो वाशिमचा रहिवाशी तर पुण्यातील एका कॉलेजचा विद्यार्थी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत तरुणीसोबत प्रेमसंबंध असताना आदित्यचे दुसर्या तरुणीशी सुरु असलेल्या प्रेमसंबंधाची माहिती सहन न झाल्याने तिने मानसिक नैराश्यातून आत्महत्या केल्याचे तपासात उघडकीस आले. आत्महत्येच्या वेळेस ती गरोदर असल्याचे तिच्या शवविच्छेदन अहवालातून उघड झाले आहे. वर्षभरात त्यांच्या प्रेमाचा शेवट प्रेयसीच्या आत्महत्येने झाल्याने तिच्या कुटुंबात प्रचंड शोककळा पसरली आहे.
39 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत नालासोपारा येथे राहते. मृत विधी (नावात बदल) ही तिची मुलगी असून ती पालघरच्या बीएच्या दुसर्या वर्गात शिकत होती. तिचे आदित्य पवार या तरुणासोबत गेल्या सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. आदित्य हा वाशिम येथे राहत असून पुण्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. आदित्यसोबतच्या प्रेमसंबंधाबाबत तसेच तो तिच्याशी लग्न करणार असल्याचे तिने तिच्या आईला सांगितले होते. अनेकदा ते दोघेही एकमेकांना भेटत होते. सप्टेंबर 2025 रोजी त्याचा वाढदिवस असल्याने विधी ही तिच्या मित्रांसोबत पुण्याला गेली होती. तिथेच त्यानी दगडूशेठ हलवाई येथील गणपती बाप्पांचे दर्शन घेतले होते. त्यानंतर ते सर्वजण त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सामिल झाले होते. यावेळी आदित्यसह त्याच्या मित्रांनी मद्यप्राशन केले होते. घरी आल्यानतर तिने पुण्यात घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला होता.
डिसेंबरला ती तिच्या मावशीच्या मुलासोबत आदित्य व त्याच्या मित्रांसोबत लोणावळा येथे गेली होती. यावेळी तक्रारदार महिला तिला सोडण्यासाठी चर्चगेट रेल्वे स्थानकात आली होती. तिथे तिची आदित्यशी भेट झाली होती. तेथून ते सर्वजण लोणावळा येथे गेले होते. सर्व काही सुरळीत सुरु असताना जानेवारी महिन्यांपासून विधी ही शांत झाली होती. घरात ती कोणाशी बोलत नव्हती, जेवत नव्हती. सतत मोबाईलवर आदित्यशी वाद घालत होते. त्यामुळे तिच्या आईने तिला भांडणाविषयी विचारणा केली होती. यावेळी तिने आदित्यचे अन्य एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगून त्याच्याकडून तिची फसवणुक झाल्याचे सांगितले.
16 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत लोणावळा येथे असताना ते दोघेही एकाच रुममध्ये होते, यावेळी त्यांच्यात शारीरिक संबंध आल्याचे तसेच त्यातून ती गरोदर असल्याचे तिला विधीकडून समजले होते. त्यामुळे तिच्या आईला जबदस्त मानसिक धक्का बसला होता. तरीही तिने तिची समजूत काढून त्याच्याशी बोलून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. आदित्यकडून झालेल्या फसवणुकीमुळे विधी ही काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावात होती. त्यातून तिला नैराश्य आले होते. याच नैराश्यातून 29 जानेवारीला सकाळी साडेआठ वाजता विधीने विरार रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक दोनवर येणार्या लोकलच्या ट्रॅकवर उडी घेऊन आत्महत्या केली होती.
याप्रकरणी वसई पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. विधीच्या आत्महत्येने तिच्या कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. दोन दिवसांपूर्वी विधीच्या आईने घडलेला प्रकार रेल्वे पोलिसांना सांगून आदित्य पवार याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विधीला आत्महत्या करण्यास, शारीरिक संबंध ठेवून तिला गरोदर राहण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु आहे. याच गुन्ह्यांत आदित्यची चौकशी करुन त्याच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.