कुटुंबातील पाचजणांना व्हिसा देतो सांगून ऑनलाईन फसवणुक

दिल्लीतील दोन भामट्यांना फसवणुकीप्रकरणी अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 फेब्रुवारी 2026
मुंबई, – ऑस्ट्रेलिया जाण्यासाठी इच्छुक असलेल्या गुजरातच्या एका तरुणासह त्याच्या कुटुंबातील पाचजणांना व्हिसा देतो असे सांगून ऑनलाईन फसवणुक करणार्‍या दिल्लीतील दोन भामट्यांना बीकेसी पोलिसांनी अटक केली. दिपतेश दिपांकर चक्रवर्ती ऊर्फ सौरभ शर्मा आणि दिपक उमाकांत तिवारी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे दिल्लीचे रहिवाशी आहे. या दोघांनी व्हिसासह इतर कामाच्या आमिषाने अनेकांना गंडा घातल्याचे बोलले जाते. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

यातील तक्रारदार तरुण मूळचा गुजरातच्या मेहसानाचा रहिवाशी आहे. त्याच्या वडिलांचा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय असून या व्यवसायात तो त्यांना मदत करतो. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत तो त्याच्या वैयक्तिक कामासाठी मालाड येथील त्याच्या मित्राकडे आला होता. यावेळी तो त्याच्याच घरी वास्तव्यास होता. 2 डिसेंबरला तो वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये आला होता. त्याला ऑस्ट्रेलिया येथे जायचे होते, त्यासाठी तो व्हिसा मिळविण्यासाठी सोशल मिडीयावर सर्च करत होता. यावेळी त्याला एक लिंक दिसली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर त्याला तिथे व्हिसा मिळत असल्याची एक जाहिरात दिसली होती. त्यामुळे त्याने जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता.

यावेळी समोरील व्यक्तीने त्याचे नाव सौरभ शर्मा असल्याचे सांगून त्याला त्याच्यासह इतर कुटुंबातील पाचजणांचे इमिग्रेशन क्लिअर करुन व्हिसा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने त्याच्याकडे एक लाखांची मागणी केली होती. उर्वरित पैसे काम झाल्यानंतर देण्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला एक लाख रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर केले होते. मात्र एक आठवडा उलटूनही त्याने त्यांच्यासह पाचजणांचे व्हिसा दिले नाही. संपर्क साधल्यानंतर तो विविध कारण सांगून त्याला टाळण्याचा प्रयत्न करत होता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने घडलेला प्रकार बीकेसी पोलिसांना सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच बीकेसी पोलिसांची एक टिम दिल्लीला गेली होती. या पथकाने दिल्लीतून दिपतेश चक्रवर्ती आणि दिपक तिवारी या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. याच गुन्ह्यांत शनिवारी दोघांनाही पोलिसांनी अटक केली. सध्या ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. व्हिसाच्या बहाण्याने या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page