नोकरीच्या आमिषाने व्हिसासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार
ट्रॉम्बे येथील घटना; पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२८ मे २०२४
मुंबई, – कतार येथे नोकरीचे आमिष दाखवून व्हिसासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन एका जोडप्याची फसवणुक झाल्याचा प्रकार ट्रॉम्बे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी जिनत मोसिम खान आणि दिलशाद सरवर या पती-पत्नीविरुद्ध ट्रॉम्बे पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
सय्यद मोहम्मद असगर हा ट्रॉम्बे, चिता कॅम्प परिसरात त्याची पत्नी आणि दोन मुलांसोबत राहतो. तो सध्या उबेर कंपनीत चालक म्हणून कामाला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यांत त्याला वसंती नायडू या परिचित महिलेने जिनत खान या महिलेविषयी माहिती दिली होती. जिनतचे विदेशात चांगली ओळख असून तिने आतापर्यंत अनेकांना विदेशात नोकरी मिळवून दिली आहे. त्यामुळे त्याने तिच्याकडे विदेशात नोकरीसाठी प्रयत्न करावे असे सांगितले होते. त्यामुळे सय्यदने जिनतचा मोबाईल क्रमांक घेऊन तिला संपर्क साधला होता. उल्हासनगर येथे भेट झाल्यानंतर जिनत आणि तिचा पती दिलशाद या दोघांनी त्याच्यासह त्याच्या पत्नीला कतार येथे नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यापूर्वी या दोघांनाही व्हिसा आणि मेडीकलसाठी लोअर परेल येथील कतार व्हिसा सेंटरमध्ये पाठविण्यात आले होते. मेडीकल आणि व्हिसासाठी या दोघांनीही झिनत आणि दिलशाद यांना टप्याटप्याने अडीच लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी त्यांना व्हिसा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते दोघेही सय्यदचा व्हिसाचा आला असून त्याच्या पत्नीच्या व्हिसाचे काम सुरु असल्याचे सांगत त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते.
एक वर्ष उलटूनही त्यांनी त्यांना व्हिसा दिला नाही. त्यामुळे सय्यद असगर याने व्हिसासाठी दिलेल्या पैशांची मागणी सुरु केली होती. मात्र या दोघांनी पैसे देण्यास नकार दिला. कतार येथे नोकरीचे आमिष दाखवून जिनत आणि दिलशाद यांनी व्हिसासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन त्याची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच सयदने ट्रॉम्बे पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या पती-पत्नीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.