चोरीच्या उद्देशाने ६५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची हत्या
गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा तासात आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ जून २०२४
ठाणे, – चोरीच्या उद्देशाने आशा अरविंद रायकर या ६५ वर्षांच्या महिलेची हत्या करुन पळून गेलेल्या आरोपीस गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा तासांत विष्णूनगर पोलिसांनी अटक केली. यश सतीश विचारे असे या २८ वर्षीय आरोपीचे नाव असून ऑनलाईन क्रिकेट जुगारात कर्ज झाल्यामुळे पैशांसाठी त्याने आशा रायकर हिची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्याच्याकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले.
आशा रायकर ही महिला डोंबिवलीतील शास्त्रीनगर हॉस्पिटलजवळील वसंत निवास इमारतीच्या रुम क्रमांक १०६ मध्ये राहत होती. शुक्रवारी आशाचा मृतदेह तिच्या राहत्या घरी सापडला होता. ही माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे उघडकीस आले होते. मृत महिलेच्या अंगावरील दागिने मारेकर्यांनी पळविले होते, त्यामुळे या हत्येमागे चोरीचा उद्देश असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे आशा हिची मुलगी दिपा दिगंबर गोरे हिच्या तक्रारीवरुन विष्णूनगर पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध चोरीसह हत्येचा गुन्हा दाखल केला होता. दिवसाढवळ्या एका वयोवृद्ध महिलेची चोरीच्या उद्देशाने झालेल्या हत्येची अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक दिपविजय भवर, देशमुख, पोलीस हवालदार जमादार, पाटणकर, गवळी, नागपुरे, मोरे, पाटील, भोसले, पोलीस नाईक भोई, पोलीस शिपाई साबळे, रायसिंग यांनी तपास सुरु केला होता. या हत्येचा कुठलाही पुरावा मारेकर्याने ठेवला नव्हता. इमारतीमध्ये सीसीटिव्ही फुटेज नव्हते. त्यामुळे मारेकर्याना पकडणे पोलिसांसाठी आव्हान होते. तरीही पोलिसांनी तपास सुरु ठेवून त्याच इमारतीत राहणार्या यश विचारे या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत यशने बेटींग लोटस ३६५ या साईटवर क्रिकेटवर ऑनलाईट बेटींग घेतली होती. त्यात त्याला प्रचंड कर्ज झाले होते. ते कर्ज फेडण्यासाठी त्याने आशा यांच्या घरात चोरीची योजना बनविली होती. त्यामुळे गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता तो तिच्या घरी गेला आणि त्याने आशा रायकर यांची हत्या करुन तिच्या गळ्यातील सोन्याची माळ, कानातील कर्णफुल चोरी करुन दरवाज्याला बाहेरुन कडी लावून पलायन केले होते. त्याच्या या कबुलीनंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. कुठलाही पुरावा नसताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या पथकाने गुन्हा दाखल होताच अवघ्या सहा तासांत आरोपीला अटक करुन या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला होता. त्यामुळे या पथकाचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.