मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
23 एप्रिल 2025
मुंबई, – चीनवरुन हार्डवेअर खरेदीसाठी उसने घेतलेल्या सुमारे एक कोटीचा अपहार करुन एका वयोवृद्ध व्यावसायिकाची दाम्त्यांनी फसवणुक केली. याप्रकरणी अबीजरअली हुसैन तिनवाला आणि त्याची पत्नी फातिमा अबीझर तिनवाला या दोघांविरुद्ध व्ही. पी रोड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून त्यांचा शोध सुरु केला आहे. या दोघांची लवकरच चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.
मोईस सोयब धोलकावाला हे 65 वर्षांचे वयोवृद्ध व्यावसायिक असून त्यांचा जहाजावर लागणार्या सामान पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्यांचे वडिल भायखळा परिसरात राहत असून त्यांच्या मालकीचे दुबई येथे एक फ्लॅट आहे. तिथे ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलीसोबत राहतात. अनेकदा ते त्यांच्या वडिलांना भेटण्यासाठी भायखळा येथे येतात. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी एका व्यावसायिक गाळ्याची गरज होती. पाच वर्षांपूर्वी त्यांची अबीजरअलीशी ओळख झाली होती. त्याचा गिरगावच्या गुलालवाडीत मालकीचा एक गाळा असल्याने त्यांनी त्याच्याकडून हा गाळा एक कोटी ऐंशी लाखांमध्ये विकत घेतला होता. त्यानंतर त्यांच्यात कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते.
नोव्हेंबर 2021 रोजी मोईस धोलकावाला यांची अबीजरअली आणि फातिमा यांनी भेट घेतली होती. त्यांना चीनवरुन काही महागडे हार्डवेअर खरेदी करायचे आहे. त्यामुळे त्यांना पैशांची गरज असल्याचे सांगून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. दोन्ही कुटुंबात चांगले संबंध असल्याने मोईस यांनी त्यांना एक कोटी पाच लाख रुपये उसने दिले होते. चीनवरुन हार्डवेअर आणल्यानंतर या मालाची विक्री करुन त्यांना पैसे देण्याचे मान्य केले होते. मात्र दोन महिने उलटूनही त्यांनी त्यांना पैसे दिले नाही.
विचारणा केल्यानंतर ते दोघेही अद्याप मालाची विक्री झाी नाही. पेमेंट मिळण्यास उशीर होईल असे विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. कोरोनानंतर मोईस हे पुन्हा दुबईला निघून गेले होते. दोन वर्षांनी कोरोना संपल्यानंतर ते मुंबईत आले आणि त्यांनी त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी केली होती. मात्र ते दोघेही पैशांसाठी चालढकल करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याच दरम्यान या दोघांनी त्यांना सात धनादेश दिले होते, मात्र ते सर्व धनादेश बँकेत न वटता परत आले होते.
बँक खात्यात पैसे नसताना अबीजरअली आणि फातिमा यांनी त्यांना धनादेश दिले होते. त्यातील एका धनादेशावर चुकीची स्वाक्षरी केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी आरोपी पती-पत्नीविरुद्ध व्ही. पी रोड पोलिसात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अबीजरअली आणि फातिमा तिनवाला या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या दोघांनाही लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.