मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सेक्स वर्कर असलेल्या एका महिलेने तिच्या तीन सहकारी महिलांच्या मदतीने एका व्यक्तीला बदनामीची भीती दाखवून खंडणी वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार गिरगाव परिसरात उघडकीस आला आहे. या व्यक्तीकडून ऑनलाईन 35 हजार रुपये घेतल्यानंतर या चारही महिला पळून गेल्या आहेत. याप्रकरणी व्ही. पी रोड पोलिसांनी आरोपी महिलांविरुद्ध खंडणीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या महिलांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यातील तक्रारदार 23 सप्टेंबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात आले होते. तिथेच त्यांची एका महिलेशी ओळख झाली होती. ही महिला सेक्स वर्कर म्हणून काम करत होती. तिच्याशी शरीर संबंधाबाबत व्यवहार ठरवून ते दोघेही टॅक्सीतून गिरगाव येथे आले होते. त्यानंतर या महिलेने त्याला पी. बी रेड, भारत भवन हॉटेलजवळील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रुममध्ये नेले होते. या रुममध्ये आधीच तीन महिला होत्या.
रुममध्ये प्रवेश करताना या चारही महिलांनी त्यांना धमकावून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्यांची बदनामीची धमकी देऊन त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी केलीद होती. इतकेच नव्हे तर त्यांचे मोबाईलवरुन व्हिडीओ काढून 22 हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले. यावेळी त्याच्याकडे तेरा हजाराची कॅश होती, ही कॅशही घेऊन त्या चारही महिला तेथून पळून गेल्या होत्या. या घटनेने तक्रारदाराला प्रचंड धक्का बसला होता.
सुरुवातीला त्याने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र या महिलांकडून अशाच प्रकारे इतर काही व्यक्तींची फसवणुक होण्याची शक्यता असल्याने त्याने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो व्ही. पी रोड पोलीस ठाण्यात गेला आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून चारही महिलांविरुद्ध तक्रार केली होती.
त्याच्या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत चारही महिलांविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 23 सप्टेंबरला हा प्रकार घडला होता. त्यामुळे या दिवसाचे परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजवरुन पळून गेलेल्या महिलांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.