मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ डिसेंबर २०२४
मुंबई, – गिरगाव परिसरातील एका वयोवृद्ध व्यापार्याच्या कार्यालयात झालेल्या सुमारे अडीच कोटीच्या घरफोडीचा पर्दाफाश करण्यात व्ही. पी रोड पोलिसांना यश आले आहे. याप्रकरीणी चंद्रभान राममनोहर पटेल या ३६ वर्षांच्या कापड विक्रेत्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
किशोरमल वीरचंदानी चौहाण हे व्यापारी असून त्यांचे गिरगाव परिसरात एक कार्यालय आहे. १२ डिसेंबर ते १८ डिसेंबरच्या मध्यरात्री त्यांच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने प्रवेश केला होता. कार्यालयात ठेवलेली २५ हजाराची कॅश आणि प्रत्येकी एक किलो वजनाचे तीन सोन्याचे बिस्कीट असा २ कोटी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार दुसर्या दिवशी निदर्शनास येताच चंद्रभान पटेल यांनी व्ही. पी रोड पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता.
अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त मोहीतकुमार गर्ग, सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप लाड, दुर्गा खर्डे, पोलीस शिपाई संदीप जाधव, कांडेकर, गिते, पोलीस हवालदार मुन्ना सिंग, मोपारी, चौधरी, तलांडे आदीचे विशेष पथक तयार करण्यात आले होते.या पथकाने परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन राजस्थानच्या जयपूर आणि गिरगाव येथील सी. पी टँक परिसरात कारवाई करुन चंद्रभान पटेल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच ही घरफोडी केल्याची कबुली दिली. चंद्रभान हा उत्तरप्रदेशच्या जौनपूर, मंडियाहूच्या बुद्धीपूरचा रहिवाशी आहे. तो कपडे विक्रीचे काम करतो. गुन्ह्यांच्या दिवशी तो गिरगाव परिसरात होता. त्याने याच कार्यालयात प्रवेश करुन ही घरफोडी केली. त्याच्याकडून चोरीचे तिन्ही सोन्याचे बिस्कीट पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.