मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 जुलै 2025
मुंबई, – सुमारे 51 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह शुद्ध सोन्याचा अपहार करुन तिघांनी पलायन केल्याची घटना काळबादेवी आणि भुलेश्वर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध व्ही. पी रोड आणि एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. या तिघांमध्ये बिशू रामकृष्ण मंगल, अविनाश गोल्डी आणि दयाशंकर शर्मा यांचा समावेश आहे. तिन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
46 वर्षांचे तक्रारदार व्यापारी असून त्यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा काळबादेवी येथे दागिने बनविण्याचा एक कारखाना आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची दयाशंकरने अविनाश गोल्डीशी ओळख करुन दिली होती. दयाशंकर हा न्यू ब्राईट एअर लॉजिस्टिक कुरिअर कंपनीचा तर अविनाश हा एम. एस गोल्डी ज्वेलर्सचा मालक आहेत. त्यानेच अविनाशला काही दागिने देण्यास सांगितले होते. त्यामोबदल्यात अविनाशने त्यांना शुद्ध सोने देण्याचे आश्वासन दिले होते. दयाशंकरवर विश्वास ठेवून त्यांनी अविनाशच्या ज्वेलर्स शॉपमध्ये 680 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पाठविले होते. त्यापैकी काही शुद्ध सोने त्याने पाठविले होते. मात्र उर्वरित 31 लाख 57 हजार रुपयांचे 322 ग्रॅम वजनाचे शुद्ध सोने न देता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी दयाशंकर आणि अविनाश या दोघांविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार अनुपम तपनकुमार पाल हे व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत मिरारोड परिसरात राहतात. त्यांचा काळबादेवी रोड, भुलेश्वर दुसरी लेन परिसरात एक शॉप आहे. याच दुकानात बिशू मंगल हा कामगार असून तो कोलकाताच्या मिदनापूरचा रहिवाशी आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो त्यांच्याकडे कारागिर म्हणून कामाला होता. जून महिन्यांत त्यांनी त्याला साडेएकोणीस लाख रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी दिले होते. मात्र ते दागिने पॉलिश न करता हिरेजडीत दागिने घेऊन तो शॉपमधून पळून गेला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा संपर्क होऊ शकला नाही. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. हिरेजडीत दागिने घेऊन बिशू मंडल हा पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी व्ही. पी रोड पोलिसांत तक्रार केली होती. या दोन्ही घटनेनंतर पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद करुन पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.