पॉलिशसाठी दिलेल्या सोन्याच्या दागिन्यांसह हिर्यांचा अपहार
वॉण्टेड नोकराला चौदा लाखांच्या मुद्देमालासह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
18 जुलै 2025
मुंबई, – पॉलिशसाठी दिलेल्या साडेएकोणीस लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहारप्रकरणी वॉण्टेड असलेल्या बिशु रामकृष्ण मंडल या नोकराला व्ही. पी रोड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 139 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि 28 डायमंड खडे असा सुमारे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कोठडीनंतर त्याला गिरगाव लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलली आहे.
अनुपम तपनकुमार पाल यांचा सोन्याचे दागिने बनविण्याचा व्यवसाय आहे. गिरगाव परिसरात त्यांच्या मालकीचा एक कारखाना असून तिथे काही कारागिर कामाला आहे. त्यात बिशु मंडल याचा समावेश होता. 1 जूनला त्यांनी बिशुला पॉलिशसह डायमंड सेंटिग करण्यासाठी 272 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि डायमंड खडे असा 19 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल दिला होता. दहा ते पंधरा दिवसांत त्याने त्यांना पॉलिशसह डायमंड सेटींग करण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र दिलेल्या मुदतीत सोन्याचे दागिने आणि हिरे परत न करता तो पळून गेला होता. त्याचा मोबाईल बंद येत होता. तो सोन्याचे दागिने आणि हिरे घेऊन पळून गेल्याची खात्री होताच अनुपम पाल यांनी व्ही. पी रोड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर बिशु मंडलविरुद्ध पोलिसांनी अपहाराचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना बिशु हा मूळचा कोलकाचा रहिवाशी असून अपहारानंतर तो त्याच्या गावी पळून गेल्याची माहिती समजली होती.
या माहितीनंतर पोलिसांची एक टिम तिथे रवाना झाली होती. या पथकाने दोन दिवस सापळा लावून मिदनापूर, कोंटाइ येथून बिशुला ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच दागिन्यांसह हिर्यांचा अपहार केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याच्याकडून पोलिसांनी चौदा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.