मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – मानवी तस्करीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड महिलेस कोलकाता येथून वडाळा टी टी पोलिसांनी अटक केली. रेश्मा संतोषकुमार बॅनजी असे या 43 वर्षीय महिलेचे नाव असून तिच्या तावडीतून दोन अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. त्यातील एका मुलाच्या शरीरावर मारहाणीचे जखमा झाला असून त्याला तिने बेदम मारहाण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे तीन वर्षांच्या बळीत मुलाला जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अमर धिरेन सरदार हे 65 वर्षांचे वयोवृद्ध अॅण्टॉप हिल येथे राहत असून हाऊसकिपिंगचे काम करतात. अनिल पूर्वय्या हा त्यांचा जावई असून तो त्याचा दोन वर्षांचा नातूसोबत पळून गेला आहे. त्याने त्याच्याच मुलाची विक्री केल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर वडाळा टी टी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी जावयाचा शोध सुरु केला होता. गुन्हा दाखल होताच अनिल पूर्वय्यासह आस्मा शेख आणि आशा पवार या तिघांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली होती. तपासात ही मानवी तस्करी करणारी टोळी असल्याचे उघडकीस आले. या टोळीने आतापर्यंत अनेक लहान मुलांची विक्री केल्याचे उघडकीस आले होते. प्रत्येक मुलांमागे ही टोळी दोन ते तीन लाख रुपये घेत होती.
आस्मा आणि आशाच्या चौकशीत त्यांनी अनिलच्या दोन वर्षांच्या मुलाला रेश्मा नावाच्या एका महिलेला विक्री केल्याचे सांगितले. रेश्मा ही ओरिसाच्या भुवनेश्वर परिसरात राहत होती. याच ठिकाणी रेश्मा ही हाय टेक डेंटल हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याचे उघडकीस आले. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल पारसकर, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश जाधव, पोलीस निरीक्षक अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, पोलीस हवालदार अंग्रक, पोलीस शिपाई शिंदे, महिला पोलीस शिपाई मुरकुटे आदीचे एक पथक भुवनेश्वर येथे पाठविण्यात आले होते. तिथे चौकशी केल्यानंतर रेश्मा ही हॉस्पिटलची नोकरी सोडून निघून गेल्याचे समजले.
तांत्रिक माहितीवरुन ती कोलकाता येथील हुबळी येथे गेल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर संबंधित पोलीस पथक कोलकाता येथे गेले होते. या पथकाने उत्तरपारा पोलिसांच्या मदतीने रेश्माचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रेश्माला हुबळी येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडे पोलिसांना बळीत मुलासह तीन वर्षांची एक मुलगी सापडली. या दोन्ही मुलीसह रेश्माला नंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अनिलच्या मुलाच्या शरीरावर मारहाण केल्याच्या काही जखमा होत्या. त्यामुळे त्याला जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चौकशीत त्याला रेश्माने मारहाण केल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत ती सध्या पोलीस कोठडीत असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.