मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ डिसेंबर २०२४
मुंबई, – भरवेगात जाणार्या एका कारने साडेतीन वर्षांच्या मुलाला चिरडल्याची घटना वडाळा परिसरात घडली. या अपघातात आरुष या मुलाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी कारचालकाविरुद्ध हलगर्जीपणाने कार चालवून मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. याच गुन्ह्यांत आरोपी कारचालकाला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे.
हा अपघात शनिवारी सायंकाळी सव्वापाच वाजता वडाळा येथील आंबेडकर कॉलेजवळील बेस्ट कार्यालयासमोर झाला. याच परिसरात मृत आरुष हा त्याचे वडिल लक्ष्मण, आई पत्नी गावरी आणि पाच वर्षांचा भाऊ आर्यन यांच्यासोबत राहत होता. त्याचे वडिल मंडप डेकोरेटर म्हणून काम करतात. फुटपाथजवळ राहत असल्याने शनिवारी सकाळी आरुष हा घरासमोरच खेळत होता. यावेळी तेथून भरवेगात जाणार्या एका कारने त्याला जोरात धडक दिली होती. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. अपघातानंतर कारचालकासह इतरानी त्याला तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. स्थानिक लोकांकडून अपघाताची माहिती मिळताच रफि अहमद किडवाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
याप्रकरणी आरुषचे वडिल लक्ष्मणच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारचालकाविरुद्ध अपघातप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी कारचालकास पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला रविवारी सुट्टीकालिन कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपी चालकाने कार चालविताना मद्यप्राशन केले होते का याचा तपास सुरु असून त्याला मेडीकलसाठी पाठविण्यात आले आहे.