टेम्पोची धडक लागून 42 वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू
अपघातानंतर टेम्पोचालकाचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 ऑगस्ट 2025
मुंबई, – टेम्पोची धडक लागून झालेल्या अपघातात एका 42 वर्षांच्या बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना वडाळा परिसरात घडली. मोहम्मद हुसैन शेख असे या मृत बाईकस्वाराचे नाव असून त्याच्या मृत्यूप्रकरणी टेम्पोचालक अजीज चाँद खान याला वडाळा पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला नोटीस देऊन सोडून देण्यात आले. अपघातानंतर पळून न जाता अजीज हा स्वतहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता असे पोलिसांनी सांगितले.
हा अपघात शुक्रवारी 15 ऑगस्टला सकाळी पावणेनऊ वाजता वडाळा येथील बीपीसीएल पेट्रोलपंपासमोरील शिवडीकडून चेंबूरकडे जाणार्या मार्गावर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरज सुभाष गुजर हे मानखुर्द येथे राहत असून सध्या वडाळा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. शुक्रवारी 15 ऑगस्ट असल्याने ते पोलीस ठाण्यात झेंडावंदनाचा कार्यक्रम असल्याने सकाळी सहा वाजता हजर झाले होते. सकाळी साडेआठ वाजता ते त्यांच्या सहकार्यासोबत बीट क्रमांक तीन चौकीजवळ जात होते. यावेळी बीपीसीएल पेट्रोलपंपासमोर त्यांना दोन वाहनांमध्ये अपघात झाल्याचे तसेच तिथे गर्दी दिसून आली. त्यामुळे गर्दीतून वाट काढून ते घटनास्थळी गेले होते. यावेळी तिथे एक बाईकस्वार जखमी अवस्थेत पडल्याचे त्यांना दिसून आला.
त्याला तातडीने जवळच्या हबीब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीसोबत रिहान मोहम्मद हुसैन शेख हा पंधरा वर्षांचा मुलगा होता. त्याच्या चौकशीत मृत मोहम्मद हुसैन हे त्याचे वडिल असून तो त्याच्या वडिलांसोबत हबीब हॉस्पिटलमध्ये जात होता. बीपीसीएल पेट्रोलपंपाजवळ येताच त्यांच्या बाईकला टेम्पोने धडक दिली होती. त्यात त्याचे वडिल मोहम्मद हुसैन हे जखमी झाले होते. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता.
मोहम्मद हुसैन हे सोने कारागिर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत ग्रॅटरोड येथील कोळसा गल्ली, रंगारी चाळ, म्हाडा इमारतीमध्ये राहत होते. अपघातानंतर टेम्पोचालक अजीज खान हा स्वतहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यामुळे सुरज गुजर यांच्या तक्रारीवरुन त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने टेम्पो चालवून एका बाईकस्वाराचा मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला अटक करुन नंतर नोटीस देऊन सोडून देण्यात आले. अजीत हा टेम्पोचालक असून सध्या कुर्ला येथील कोहीनूर हॉस्पिटलजवळील म्हाडा इमारतीमध्ये राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.