मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
23 ऑगस्ट 2025
मुंबई, – पोलीस गस्त सुरु असताना एका संशयास्पद जाणार्या कारला अडवून वडाळा टी टी पोलिसांनी गांजासह दोन आरोपींना अटक केली. अबूबकर मेहंदी हसन आणि शहबाज शमीम खान अशी या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून एक व्हॅगन कारसह 51 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मुंबई शहरात ड्रग्ज तस्करीच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशावरुन स्थानिक पोलिसांनी परिसरात नाकाबंदी आणि गस्त घालण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी दुपारी पावणेतीन वाजता वडाळा टी टी पोलीस ठाण्याचे एक विशेष पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना एक व्हॅगन कार संशयास्पद जाताना दिसली. त्यामुळे पोलिसांनी या कारला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र गस्त घालणार्या पोलिसांना पाहताच कारचालक तेथून जाण्याचा प्रयत्न करु लागला. यावेळी पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन कारला काही अंतरावर अडवून कारची झडती घेतली होती. यावेळी कारमध्ये पोलिसांना 51 किलो 500 ग्रॅम वजनाचा गांजाचा साठा सापडला. या गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात सव्वादहा लाख रुपये किंमत आहे.
याच गुन्ह्यांत कारचालक अबूबकर हसन आणि शहबाज खान या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनी हा गांजा मुंबई शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांवर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर या दोघांनाही शनिवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवार 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा गांजा त्यांनी ओरिसा येथून आणल्याचा संशय आहे. त्यांच्या चौकशीतून इतर काही आरोपींची नावे उघडकीस आले आहे. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांना हा गांजा कोणी दिला, त्यांनी यापूर्वीही गांजाची तस्करी केली आहे का, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे, पोलीस निरीक्षक अनुराधा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण नवले, माधवेंद्र येवले, पोलीस हवालदार धनंजय जाधव, अजुमुद्दीन मिर, संपत गोसावी, रविंद्र ठाकूर, रमेश कुटे, पोलीस शिपाई बापू पाटोळे, राजू शिंदे, रणजीत चौधरी, आनंद भोसले, विजय हनुमंते, नबीलाल बोरगावकर, शफीक शेख आणि रमेश बोरसे यांनी केली.