हत्या झालेल्या मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर २५ दिवसांनी अत्यंसंस्कार
अपहरणासह हत्येचा गूढ अद्याप कायम; मारेकर्याचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ मार्च २०२४
मुंबई, – जानेवारी महिन्यांत घरातून मिसिंग झालेला आणि एक महिन्यानंतर मृतदेह सापडलेल्या बारा वर्षांच्या मुलाचा अखेर २५ दिवसांनी त्याच्या पालकांनी ताबा घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहे. मारेकरी पकडला जात नाही आणि अपहरणासह हत्येमागील कारण समजत नाही तोवर मुलाचा मृतदेह ताब्यात घ्यायचा नाही असा पवित्रा त्याच्या पालकांनी घेतला होता, मात्र शवागृहात मृतदेह कुजू नये म्हणून त्यांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केल्याचे सांगितले जाते. दरम्यान या हत्येमागील गूढ अद्याप कायम असून मारेकर्याच्या अटकेसाठी वडाळा टी टी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम आहे. मारेकर्याच्या अटकेसाठी मुंबईसह दिल्ली, कोलकाता, आसाम आणि जम्मू-काश्मीरपर्यंत पोलीस गेले, मात्र त्याला पकडणयात अद्याप पोलिसांना यश आले नसल्याचे पोलिसांकडून सांगणयात आले.
४९ वर्षांचे तक्रारदार त्याच्या पत्नी आणि संदीप नावाच्या बारा वर्षांच्या मुलासोबत वडाळा येथील मदिना मशिदीजवळील शांतीनगर परिसरात राहतो. याच परिसरातील संगमनगर येथे त्याचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. त्याचा मुलगा संदीप हा आदर्श स्कूलमध्ये सहावीत शिकत होता. त्याच्या शाळेची वेळ दुपारी साडेबारा ते साडेपाच अशी होती. अनेकदा त्याची पत्नी संदीपला शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी जात होती. २८ जानेवारीला शाळेला सुट्टी असल्याने संदीप हा घरातच होता. रात्री सव्वाआठ वाजता बाहेर जातो असे सांगून संदीप निघून गेला. मात्र बराच वेळ झाल्यानंतर तो घरी परत आला नाही. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी त्याचा शोध सुरु केला होता. सर्वत्र शोध घेतल्यानंतर संदीप कुठेच सापडला नाही. त्यामुळे त्यांनी वडाळा टी टी पोलीस ठाण्यात संदीपच्या मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. मात्र आठवडाभर शोध घेऊन संदीप कुठेच सापडला नाही. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने त्याचा शोध सुरु केला होता. मात्र फुटेजवरुन पोलिसांना काहीही सुगावा लागला नाही. ही शोधमोहीम सुरु असतानाच तब्बल एक महिना सहा दिवसांनी ४ मार्च २०२४ रोजी डोके नसलेला एक मृतदेह वडाळा येथील एका निर्जनस्थळी पोलिसांना सापडला. हा मृतदेह त्याच्या पालकांना दाखविला असता त्यांनी तो मृतदेह त्यांच्याच मुलाचा असल्याचे ओळखले होते. त्यानंतर पंचनामा करुन पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये पाठविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर संदीपच्या मृत्यूचे अधिकृत कारण समजू शकणार आहे. प्राथमिक तपासात संदीपची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अपहरणासह हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम वाढविले होते.
दुसरीकडे मुलाच्या हत्येने त्याच्या पालकांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यांच्या मुलाचे अपहरण आणि हत्या कोणी केली, त्यामागे त्याचा काय उद्देश होता. त्यामुळे मारेकरी पकडले जात नाही तोवर त्याचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्याच्या पालकांनी घेतला होता. २५ दिवसांपासून संदीपचा मृतदेह शवागृहात होता. मृतदेह कुजू नये म्हणून अखेर त्याच्या पालकांनी मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्यावर अखेर अंत्यसंस्कार केले आहेत. मात्र मुलाच्या अपहरणासह हत्येबाबत अद्याप त्यांना पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी गंभीर दखल घेत वडाळा टीटी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते. या गुन्ह्यांत विपुल सिगरी या संशयिताचे नाव समोर आले होते. सीसीटिव्ही फुटेजमध्ये त्याला शेवटचे विपुलसोबत पाहण्यात आले होते. तो मूळचा कोलकाताचा रहिवाशी होता. मात्र या घटनेनंतर तो पळून गेला होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलीस टिम मुंबईसह दिल्ली, आसाम, कोलकाता, जम्मू-काश्मीरपर्यंत गेले होते. मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी होत होता. विपुलचा पूर्वइतिहास पाहिल्यानंतर तो भुरटा चोर असून त्याच्याविरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो नपुंसक असल्याचा संशय असून त्याने लैगिंक अत्याचाराच्या उद्देशाने हा गुन्हा केला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र तो पळून गेल्याने या हत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. त्याच्या अटकेनंतर या अपहरणासह हत्येमागील कारण समजू शकेल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.