मोबाईलवरुन झालेल्या वादातून 32 वर्षांच्या व्यक्तीची हत्या
हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 एप्रिल 2025
मुंबई, – मोबाईलवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून एका 32 वर्षांच्या व्यक्तीची त्याच्याच परिचित आरोपीने मारहाण आणि नंतर गळा आवळून हत्या केल्याची घटना वडाळा परिसरात घडली. मोहम्मद सलमान मोहम्मद इद्रीसी अन्सारी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी मोहनकुमार राजकुमार वर्मा या 25 वर्षांच्या आरोपीस वडाळा पोलिसांनी अटक केली. हत्येनंतर तो पळून गेला, मात्र गुन्हा दाखल होताच त्याला काही तासांत पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी 16 एप्रिलला रात्री पावणेबारा वाजता वडाळा येथील शांतीनगर, शिवडी-चेंबूर रोड, दिनबंधूनगरजवळ घडली. मोहम्मद सलमान आणि मोहनकुमार हे दोघेही वडाळा परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. या दोघांमध्ये मोबाईलवरुन काही दिवसांपासून वाद झाला होता. त्यातून त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते. बुधवारी रात्री मोहम्मद सलमान आणि मोहनकुमार यांच्यात मोबाईलवरुन पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात त्याने मोहम्मद सलमानला बेदम मारहाण केली होती. या मारहाणीनंतर त्याने त्याची गळा आवळून हत्या केली होती. या घटनेनंतर मोहनकुमार तेथून पळून गेला होता.
मोहम्मद सलमानला स्थानिक रहिवाशांनी तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या मोहनकुमार वर्मा या आरोपीस गुरुवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. मोबाईलवरुन झालेल्या क्षुल्लक वादातून मोहम्मद सलमानच्या हत्येनंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.