मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
12 जुलै 2025
मुंबई, – दारुच्या नशेत झालेल्या वादातून निखील सकरम लोणधे या 32 व्यक्तीची त्याच्याच दोन मित्रांनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी वडाळा परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच योगेश कुडतरकर आणि कल्पेश कुडतरकर या आरोपी बंधूंना रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी अटक केली. या दोघांनाही रविवारी लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही घटना शनिवारी सकाळी सहा वाजता वडाळा येथील बसडेपोजवळील रघुनाथ सकरम महाडिक रोडजवळ घडली. याच परिसरात निखीन आणि कुडतरकर बंधू राहत असून ते तिघेही चांगले मित्र आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा ते तिघेही परिसरात मद्यप्राशन करत होते. पहाटेपर्यंत त्यांची पार्टी सुर होती. सकाळी सहा वाजता त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. याच वादातून योगेश आणि कल्पेश यांनी निखील याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर ते दोघेही पळून गेले होते. ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या निखीलला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या घटनेनंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या दोन्ही बंधूंचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना कल्पेश अणि योगेश कुडतरकर या दोन्ही आरोपी बंधूंना पोलिसांनी अटक केली. दारुच्या नशेत झालेल्या वादातून त्यांनी निखीलची हत्या केल्याची कबुली दिली. चालू वर्षांतील लोणधे कुटुंबातील ही दुसरी दुर्देवी घटना आहे. 24 फेब्रुवारी 2025 रोजी त्याची आई निखीलच्या मुलासोबत फुटपाथवर झोपली होती. यावेळी एका कारने तिला जोरात धडक दिली होती. त्यात निखीलच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता निखीलची त्याच्याच दोन मित्रांनी तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली.