मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१७ एप्रिल २०२४
मुंबई, – अंथरुणावर खिळून असलेल्या एका सोळा वर्षांच्या अल्पवयीन मतिमंद मुलीवर घरात घुसून अज्ञात व्यक्तीने लैगिंक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वडाळा परिसरात उघडकीस आला आहे. पिडीत मुलगी पाच महिन्यांची गरोदर असून तिच्यावर केईएम हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वडाळा पोलिसांनी भादवीसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. आरोपी याच परिसरातील रहिवाशी असून पिडीत मुलीच्या परिचित आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे आरोपीच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
४६ वर्षांची तक्रारदार महिला वडाळा परिसरात राहत असून पिडीत ही तिची मुलगी आहे. ती मतिमंद असून तिला बोलता आणि चालता येत नाही. लहानपणापासून तिला सतत फिट येण्याचा त्रास होता. मार्च महिन्यांत ती लघुशंका करताना सतत ओरडत होती, त्यामुळे तिच्या आईने तिच्या शरीराची संपूर्ण तपासणी केली होती. यावेळी तिच्या गुप्त भागावर नखाने ओरखल्याच्या जखमा होत्या, हा भाग लालसर झाला होता. त्यामुळे तिने मेडीकलमधून औषधे आणून तिच्यावर घरात उपचार केले होते. शनिवारी १५ जूनला तिला फिट आली होती, त्यामुळे तिपे तिला उपचारासाठी जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिच्यावर उपचार सुरु करण्यात आले, तिच्या मेडीकल रिपोर्टमध्ये ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे उघडकीस आले. या रिपोर्टबाबत नंतर डॉक्टरांनी तिच्या आईला सांगितले होते. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. अनेकदा तक्रारदार महिला कामानिमित्त बाहेर जात असल्याने तिची मुलगी एकटीच घरी राहत होती. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात प्रवेश करुन पिडीत मुलीवर लैगिंक अत्याचार केला होता. त्यातून ती गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
या घटनेनंतर तिने वडाळा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध ३७६ (२), (जे), (एल) भादवी सहकलम ४, ५ (आय), (जे), (पी), (के), ६, ८, ९ (के) पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. आरोपी परिचित असल्याने परिसरातील प्रत्येक संशयितांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. रविवारी रात्री उशिरा उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.