बॅग चोरीच्या गुन्ह्यांतील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक
आठ गुन्ह्यांची उकल तर चार लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३० सप्टेंबर २०२४
मुंबई, – गर्दीच्या वेळेस प्रवाशांच्या बॅगेची चोरी करुन पळून जाणार्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना वडाळा रेल्वे पोलिसांनी अटक केली. फिरोजअली सोहिदअली आणि मकसूद मारुफ शेख ऊर्फ रॉबीन अशी या दोघांची नावे असून त्यांच्या अटकेने बॅग चोरीच्या आठ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून त्याच्याकडून पोलिसांनी चार लाख तीन हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस कोठडीनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत रेल्वे हद्दीत गर्दीच्या वेळेस प्रवाशांच्या बॅग चोरी होण्याच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. बॅग चोरीच्या या वाढत्या गुन्ह्यांची पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे यांनी गंभीर दखल घेत सर्वच रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह गुन्हे शाखेला या गुन्ह्यांतील आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र शिवरामवार, पोलीस उपनिरीक्षक वसंत आढारी, पोलीस हवालदार विशाल वर्षे, महिला पोलीस हवालदार शिंदे, अंमलदार सतीश ठोंबरे, सुजीतकुमार वेळे, अभिमन्यू जाधव, प्रकाश कांबळे, राजेंद्र गर्जे, रामजी पुजलवाढ, समाधान सानप, प्रसाद वाडकर, सौरभ चौधरी, सचिन शिंदे यांनी तपासाला सुरुवात केली होती. या पथकाने प्राप्त सीसीटिव्ही फुटेजवरुन फिरोजअलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडील बॅगेची चौकशी केल्यानंतर त्याने ती बॅग त्याचा मित्र रॉबीनच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या पथकाने रॉबीनचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच मकसूद ऊर्फ रॉबीन याला पोलिसांनी नळबाजार येथील राहत्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले.
बॅग चोरीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर या दोघांनाही लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीत केलेल्या चौकशीत मकसूद ऊर्फ रॉबीन फिरोजअली हे दोघेही बॅग चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांच्या अटकेने कुर्ला, वडाळासह इतर पोलीस ठाण्यातील आठहून अधिक बॅग चोरीसह इतर गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून चोरीचे लॅपटॉपसह इतर साहित्य असा चार लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बॅग चोरीच्या गुन्ह्यांतील दोन आरोपींना अटक करुन आठ गुन्ह्यांची उकल तसेच चोरीचा चार लाखांचा मुद्देमाल जप्त करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र शिवरामवार, पोलीस उपनिरीक्षक वसंत आढारी, पोलीस हवालदार विशाल वर्षे, महिला पोलीस हवालदार शिंदे, अंमलदार सतीश ठोंबरे, सुजीतकुमार वेळे, अभिमन्यू जाधव, प्रकाश कांबळे, राजेंद्र गर्जे, रामजी पुजलवाढ, समाधान सानप, प्रसाद वाडकर, सौरभ चौधरी, सचिन शिंदे यांचे पोलीस आयुक्त रविंद्र शिसवे, पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी कौतुक केले आहे.