कामाच्या दुसर्या दिवशी 65 लाखांच्या मुद्देमालावर हातसफाई
चोरीचा गुन्हा दाखल करुन पळून गेलेल्या नोकराचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 जानेवारी 2026
मुंबई, – कामाच्या दुसर्या दिवशी सुमारे 65 लाखांच्या हिरेजडीत, सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर नोकराने हातसफाई केल्याची धक्कादायक घटना वडाळ्यातील एका व्यावसायिकाच्या घरी उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुजरातच्या अहमदाबादचा रहिवाशी असलेल्या राजू भावेश नावाच्या नोकराविरुद्ध वडाळा टी टी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. राजू हा अहमदाबादचा रहिवाशी असल्याने एक टिम तिथे पाठविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगितले.
ही घटना बुधवारी 14 जानेवारीला दुपारी साडेबारा वाता ते सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास वडाळा येथील लोढा न्यू कप रोड, लोढा टॉवर तीनम्ये घडली. याच परिसरातील लोढा इव्होक अपार्टमेंटच्या फ्लॅट क्रमांक ए/2402 मध्ये अभिषेक संजय अग्रवाल हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांची रायगडच्या खोपोलीमध्येबाबा स्टिल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजग कंपनी आहे. त्यांचा फोर बीएचके फ्लॅट असून एका बेडरुममध्ये त्यांचे आई-वडिल राहतात. याच बेडरुममध्ये एक लाकडी कपाट असून त्यात गोदरेज कंपनीचे एक डिजीटल लॉकर आहे. या लॉकरमध्ये त्यांनी त्यांच्या घरातील मौल्यवान हिरेजडीत, सोन्याचे तसेच चांदीचे दागिने ठेवले होते. त्यांच्याकडे सनी नावाचा एक तरुण घरगडी म्हणून कामाला होता, त्याला गावी खाजगी कामानिमित्त जायचे होते. त्यामुळे तो काम सोडून निघून गेला होता. यावेळी त्यांच्या सासूच्या बहिणीकडे काम करणार्या राजू हा त्यांच्याकडे कामासाठी आला होता.
12 जानेवारीपासून तो त्यांच्याकडे कामावर हजर झाला होता. त्याच्यावर घरातील सर्व कामाची जबाबदारी होती. दिवसा काम करुन तो मुख्य दरवाज्याजवळच असलेल्या रुममध्ये झोपत होता. त्यांच्या सासूने राजूला त्यांच्या घरी पाठविले होते, त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला कामावर ठेवले होते. दोन दिवस त्याने घरातील सर्व काम व्यवस्थित केले होते, त्यामुळे तो त्यांचे घर चांगले सांभाळू शकतो असे त्यांना वाटले होते. बुधवारी राजूच्या मोबाईलचा रिचार्ज संपला होता, त्यामुळे त्यांनी त्याचा 28 दिवसांचा रिचार्ज केला होता. त्याच दिवशी त्यांच्या आई-वडिलांना जयपूर येथे देवदर्शनासाठी जायचे होते. त्यामुळे ते आई-वडिलांना सोडण्यासाठी नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेले होते.
यावेळी घरात राजू हा एकटाच होता. घरातून बाहेर जाताना त्यांनी सर्व बेडरुमचे दरवाजे लॉक केले होते. आई-वडिलांना विमानतळावर सोडून ते त्यांच्या खोपोलीतील कंपनीत गेले होते. काम संपल्यानतर ते रात्री आठ वाजता घराजवळ आले होते. कारचालक योगेश यादवला सामान घरी देण्यास सांगून ते जवळच्या गणेश मंदिरात दर्शनासाठी गेले होते. घरी गेलेल्या योगेशने त्यांना कॉल करुन दरवाजा कोणीही उघडत नाही असे सांगितले. त्यांच्याकडे घराची दुसरी चावी होती, त्यामुळे ते तिथे गेले. दरवाजा उघडून ते आतमध्ये गेले. यावेळी त्यांना घरात राजू नसल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांच्या पत्नीकडे विचारणा केली, मात्र तिला राजूविषयी काहीच माहिती नव्हती, तिने त्याला कुठेही बाहेर पाठविले नव्हते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी घरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती.
या फुटेजमध्ये राजू हा सव्वासहा वाजता घरातून जात असल्याचे दिसून आले. त्यांनी त्याला कॉल केला, त्याचा मोबाईल बंद होता. यावेळी त्यांना त्यांच्या आईचा बेडरुम उघडा असल्याचे तसेच लाईट सुरु असल्याचे दिसले. त्यांनी लाईट बंद करुन दरवाजा बंद केला. घरात चोर असल्याचा संशय आल्याने त्यांनी त्यांच्या चुलत भावाला घरी बोलावून घेतले. तो त्याच्या पत्नीसोबत घरी येताच त्यांनी आई-वडिलांच्या बेडरुमची पाहणी केली होती. त्यात त्यांना चारपैकी तीन लाकडी कपाट तुटलेले दिसले. या तिन्ही लॉकरची पाहणी केल्यानंतर 1138 ग्रॅम वजनाचे विविध हिरेजडीत, सोन्याचे दागिने, चांदीचे शिक्के असा सुमारे 65 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पुन्हा घरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. यावेळी त्यांना राजूशिवाय त्यांच्या घरीही आले नव्हते. जाताना त्याच्या अंगावरील शर्ट फुगलेला आणि पॅण्टचे खिसे भरलेले दिसून आले. राजूनेच घरात चोरी करुन पलायन केल्याचा उघड होताच त्यांनी ही माहिती वडाळा टी टी पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी अभिषेक अग्रवाल यांची पोलिसांनी सविस्तर जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी नोकर राजूविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला.
तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. तो मूळचा अहमदाबादचा रहिवाशी असल्याने चोरीनंतर गावी पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची एक टिम अहमदाबादला पाठविण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी उघडकीस आलेल्या या चोरीच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.