हत्येच्या गुन्ह्यांतील दोन्ही आरोपींना आजन्म कारावाराची शिक्षा

बहिणीचा आंतरजातीय विवाह घडवून आणले म्हणून केली हत्या

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
20 डिसेंबर 2025
मुंबई, – पाच वर्षांपूर्वी वडाळा परिसरात राहणार्‍या वसंतकुमार आरमोगम देवेंद्र या 31 वर्षांच्या महानगरपालिकेच्या सफाई कर्मचार्‍याच्या हत्येतील दोन्ही आरोपींना विशेष सेशन कोर्टाने आजन्म कारावासासह दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे. बाळकृष्ण नाडर ऊर्फ बाला आणि मार्गस बालामुर्गन वेलास्वामी नाडर अशी या दोघांची नावे आहेत. दोन्ही आरोपींविरुद्ध सबळ पुराव्यासह साक्षीदारांनी दिलेल्या जबानीवरुन अवघ्या पाच वर्षांत या खटल्याचा निकाल लागला आणि विशेष सेशन कोर्टाने दोन्ही आरोपींना दोषी ठरवून त्यांना आजन्म कारावसाची शिक्षा ठोठावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांनी सांगितले.

प्रियांका देवेंद्र ही महिला तिच्या पती वसंतकुमार देवेंद्र आणि मुलीसोबत वडाळ्यातील म्हाडा कॉलनी, शुभम सोसायटीमध्ये राहत होती. तिचे पती वसंतकुमार हे महानगरपालिकेतील वांद्रे येथील कार्यालयात क्लीनअप गाडीवर सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यांचा कॉमन मित्र मनी देवेंद्रचा विवाह बबली या तरुणीशी झाला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये परिचित नातेवाईक, मित्रमंडळींसाठी पार्टीचे आयोजन केले होते. 30 मे 2021 रोजी या कार्यक्रमांला इतर नातेवाईकांसोबत प्रियांका आणि वसंतकुमार हे दोघेही गेले होते. रात्री दहा वाजता तिचा पती वसंतकुमार हा त्यांचा मित्र तंगदुराई तेवरसोबत गप्पा मारत होते.

याच दरम्यान तिथे त्याच परिसरात राहणारा बालकृष्ण नाडर व त्याचा मित्र मार्गस नाडर आले. काही कळण्यापूर्वीच या दोघांनी वसंतकुमारवर कोयत्या आणि चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या डोक्याला, हाताला, पाठीला, पोटाला आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती. रक्तबंबाळ झालेल्या वसंतकुमारला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच वडाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी प्रियांका देवेंद्रच्या जबानीवरुन पोलिसांनी बाळकृष्ण नाडर आणि मार्गस नाडर या दोघांविरुद्ध कट रचून हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

तपासात प्रियांकाचा विघ्नेश नावाचा एक भाऊ असून 2020 साली त्याने बाळकृष्णची बहिण संध्याशी प्रेमविवाह केला होता. या प्रेमविवाह बाळकृष्णाच्या घरच्या लोकांचा विरोध होता. त्यामुळे त्याने वसंतकुमारला या दोघांनी लग्न केल्यास त्याला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली होती. तरीही वसंतकुमारने विघ्नेश आणि संध्या यांचा विवाह घडवून आणला होता. त्याचा बाळकृष्णच्या मनात प्रचंड राग होता. याच रागातून त्याने मार्गसच्या मदतीने वसंतकुमारची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली होती. त्यामुळे या गुन्ह्यांत एससीएसटी या कलमांची वाढ करण्यात आली होती. हत्येनंतर पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना नंतर पोलिसांनी अटक केली होती.

तपास पूर्ण होताच त्यांच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी न्या. एस. व्ही सहारे यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरविले होते. त्यानंतर बाळकृष्ण आणि मार्गस या दोघांनाही कोर्टाने आजन्म कारावासासह दहा हजार रुपयांच्या दंडाची, दंडाची रक्कम न भरल्यास आणखीन सहा महिने तसेच अनूसुचित जाती-जमाती (अत्याचारास प्रतिबंधक) कायदा कलमांतर्गत दोन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा तसेच दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

या गुन्ह्यांचा तपास जिल्हा अधिक्षक डॉ. अश्विनी पाटील, पोलीस निरीक्षक सुनिल वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक भारती यांनी केला तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक अनुराधा भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले. सरकारी अभियोक्ता म्हणून वीणा शेलार यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक जोशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिभाऊकर, पोलीस हवालदार यादव, महिला पोलीस शिपाई बरकडे, पोलीस शिपाई ब्राम्हणे, शेळके यांनी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजाविली होती असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष आवळे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page