फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस सात महिन्यांनी अटक

स्वस्तात हिरेजडीत दागिने देण्याच्या आमिषाने फसवणुकीचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
11 डिसेंबर 2025
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस सात महिन्यांनी कांदिवली पोलिसांनी अटक केली. रिषीत प्रविणकुमार गोटेचा असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वस्तात हिरेजडीत दागिने देण्याचे आमिष दाखवून त्याने एका रियल इस्टेट व्यावसायिकाची 12 लाख 35 हजाराची फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिव हन्सारी मिश्रा हे रियल इस्टेट व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियासोबत कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरात राहतात. गेल्या वर्षी त्यांची एका मित्रामार्फत रिषीतशी ओळख झाली होती. या ओळखीत रिषीतने तो हिरे व्यापारी असून त्याची बीकेसी येथे स्वतची कंपनी असल्याचे सांगितले होते. शिव मिश्रा यांना त्यांच्या पत्नीसाठी हिरेजडीत सोन्याची एक रिंग घ्यायची होती, त्यामुळे त्याने रिषीतकडे हिरेजडीत रिंगची मागणी केली होती. यावेळी त्याने त्यांना स्वस्तात रिंग देण्याचे आश्वासन दिले होते. त्याने त्याला व्हॉटअप विविध डिझाईनचे रिंग पाठविले होते. त्यापैकी त्यांन एक कानातील रिंगची जोडी आणि दोन सुट्टे हिरे पीस पसंद केले होते. त्यासाठी त्यांनी त्याला 12 लाख 35 हजार रुपये दिले होते. त्यापैकी 3 लाख 35 हजार कॅश तर नऊ लाखांचा धनादेश त्याच्या बँकेत टाकला होता.

या पेमेंटनंतर त्याने त्यांना एक आठवड्यात हिरेजडीत दागिने देण्याचे आश्वासन दिले, मात्र एक महिना उलटूनही त्याने त्यांना दागिने दिले नाही. विचारणा केल्यानंतर तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांना शिवीगाळ करुन दमदाटी सुरु केली होती. इतकेच नव्हे तर दागिने देणार नाही किंवा दागिन्यांसाठी दिलेले पैसे परत करणार नाही अशी धमकी दिली होती. रिषीतकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच शिव मिश्रा यांनी त्याच्याविरुद्ध कांदिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हिरेजडीत दागिन्यांच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच रिषीत हा पळून गेला होता. त्यामुळे त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या सात महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या रिषीत गोटेचा याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने स्वस्तात हिरेजडीत दागिने देण्याचे आमिष दाखवून इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page