27 वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक

आरोपीविरुद्ध लोकल कोर्टाकडून जाहीरनामा वॉरंट जारी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
13 मार्च 2026
मुंबई, – सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यांत जामिनावर बाहेर येताच पळून गेलेल्या एका आरोपीस साकिनाका पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. लवू दत्ताराम ठाकूर असे या 57 वर्षीय आरोपीचे नाव असून गेल्या 27 वर्षांपासून तो फरार होता. त्याच्याविरुद्ध लोकल कोर्टाने जाहीरनामा वॉरंट जारी केले होते. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

लवू ठाकूर हा घाटकोपर येथील असल्फा गाव, सुभाषनगर, हरिकुंज सोसायटीमध्ये राहत होता. 1998 साली त्याच्याविरुद्ध साकिनाका पोलीस ठाण्यात 353, 332, 427 भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन कोर्टाने त्याला जामिन मंजूर केला होता. मात्र जामिनावर बाहेर येताच लवू हा पळून गेला होता.

तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध वेगवेगळे वॉरंट बजाविण्यात आले होते. तरीही तो खटल्याच्या सुनावणीसाठी हजर राहिला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्टाने जाहीरनामा वॉरंट काढून त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश साकिनाका पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप मैराळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल यादव यांच्या पथकातील पोलीस हवालदार सांडव आणि होळकर यांनी लवूचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना तो विरार परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस हवालदार सांडव आणि होळकर यांनी विरार येथील चंदनसार रोड, तांदूळ बाजारसमोर, परमात्मा पार्क, एम. व्ही पॅराडाईज अपार्टमेंटच्या सी/5 या फ्लॅटमध्ये राहणार्‍या लवू ठाकूर याला ताब्यात घेतल होते. तपासात तो 27 वर्षांपासून फरार असलेला वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला याच गुन्ह्यांत अटक करुन लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page