मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ नोव्हेंबर २०२४
ठाणे, – खंडणीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. सतीश बाबूलाल गुप्ता ऊर्फ सतीश तिवारी असे या आरोपीचे नाव असून तो गेल्या सतरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर सतरा वर्षांनी त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी उत्तरप्रदेश पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ट्रान्झिंट रिमांडवर त्याला पुढील चौकशीसाठी उत्तरप्रदेशात नेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सतीश तिवारी हा मूळचा उत्तरप्रदेशच्या उन्नाव, वारा सगवरच्या अलमापूरचा रहिवाशी आहे. जानेवारी २००६ साली त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत तो गेल्या सतरा वर्षांपासून फरार होता. अटकेच्या भीतीने तो उत्तरप्रदेशातून पळून गेला होता. गेल्या काही वर्षांपासून तो ठाण्यात वास्तव्यास होता. त्याच्या वास्तव्याची माहिती मिळताच उत्तरप्रदेश पोलिसांनी ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाला ही माहिती देऊन त्याच्या अटकेसाठी मदत करण्याची विनंती केली होती. या माहितीनंतर खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस, पोलीस शिपाई तानाजी पाटील, संतोष वायकर यांनी उत्तरप्रदेशच्या एसटीएफच्या अधिकार्यांच्या मदतीने संयुक्तपणे कारवाई करुन सतीश तिवारीला ठाण्यातील वागळे इस्टेट, रोड क्रमांक दहा परिसरातून शिताफीने अटक केली. चौकशीदरम्यान खंडणीच्या गुन्ह्यांतील तोच वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला उत्तरप्रदेशच्या एसटीएफ पोलिसांकडे सोपविण्यात आले होते.