रॉबरीसह मोक्काच्या अठरा गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीस अटक
सोनसाखळी चोरीसह बाईक चोरीचे अनेक गुन्हे दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जानेवारी २०२५
ठाणे, – रॉबरीसह मोक्काच्या अठराहून अधिक गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. ऑन अली सर्फराज जाफरी ऊर्फ शेट्टी असे या २४ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध सोनसाखळी चोरीसह बाईक चोरीने अनेक गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
काही दिवसांपूर्वी शांतीनगर पोलीस ठाण्यात एक रॉबरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली हाती. या गुन्ह्यांचा सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार हे तपास करत होते. हा तपास सुरु असताना या गुन्ह्यांतील एक आरोपी ताडी पिण्यासाठी भिवंडीतील बेलका मैदान चव्हाण कॉलनीजवळ येणार असल्यासची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुकत अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, किशोर थोरात, पोलीस शिपाई अमोल इंगले, भावेश घरत, विजय कुंभार, नितीन बैसाने यांनी तिथेसाध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी तिथे आलेल्या ऑन अली जाफरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
चौकशीत ऑन अली हा भिवंडीतील पिराणीपाड्याचा रहिवाशी असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून जप्त केलेली ऍक्टिव्हा चोरीची असल्याचे उघडकीस आले. त्याने अलीकडेच्या काळात चार सोनसाखळी आणि तीन बाईक चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी २ लाख ६५ हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. रॉबरीसह मोक्काच्या सुमारे अठराहून अधिक गुन्ह्यांत तो वॉण्टेड होता. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात बाईक, सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.