मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
14 एपिल 2025
मुंबई, – गेल्या 20 वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या एका आरोपीस शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली. सुरेशकुमार फुलचंद वैश्य असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला सोमवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. गेल्या वीस वर्षांपासून सुरेशकुमार हा फरार असल्याने त्याच्याविरुद्ध विशेष सेशन कोर्टाने अटकपूर्व वॉरंट जारी करताना त्याला पाहिजे आरोपी घोषित केले होते असे विलास दातीर यांनी बोलताना सांगितले.
2005 साली सुरेशकुमारविरुद्ध शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात 279, 337, 304 अ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पळून गेला होता. तपासात सुरेशकुमार हा अॅण्टॉप हिल येथील सायन कोळीवाडा, कोकरी आगाराजवळील जय महाराष्ट्र नगरात राहत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्या घरी जाऊन त्याचा शोध घेण्यात आला होता. मात्र तो घरातून पळून गेला होता. या घटनेनंतर तो मुंबईतून पळून गेला होता. या गुन्ह्यांत तो गेल्या वीस वर्षांपासून फरार होता. तरीही त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. याच गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध अटकपूर्व वॉरंट जारी करताना विशेष कोर्टाने त्याला पाहिजे आरोपी घोषित केले होते. तसेच त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास दातीर यांच्या पथकाने त्याचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना सुरेशकुमार हा गुजरात बडोदरा शहरात वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर या पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. यावेळी त्याला बडोदराच्या न्यू व्हीआयपी रोड, खोडियारनगर-गणेश नगर परिसरातून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटील आणि पोलीस शिपाई केवट यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान त्याचा संबंधित गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर सोमवारी त्याला दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.