स्टॅडिंग वॉरंटमधील वॉण्टेड आरोपीस वसई येथून अटक
आरोपीविरुद्ध मुंबईसह गोव्यात 28 हून अधिक गुन्ह्यांची नोंद
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
26 सप्टेंबर 2025
मुंबई, – अजामिनपात्रासह स्टॅडिंग वॉरंटमधील एका मोस्ट वॉण्टेड आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी वसई येथून अटक केली. शब्बीर शेरअली मर्चंट ऊर्फ शब्बीर शेरअली विरजी ऊर्फ सन्नी असे या 52 वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला पुढील चौकशीसाठी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
शब्बीर विरजी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईसह गोव्यातील विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत तो जामिनावर होता. मात्र जामिनावर बाहेर येताच वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विविध कोर्ट केसमध्ये अजामिनपात्र वॉरंट आणि स्टॅडिंग वॉरंट काढून त्याच्या अटकेचे आदेश कोर्टाने जारी केले होते.
या आदेशांची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला शब्बीर विरजीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर सर्व युनिटने त्याची माहिती घेऊन त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना शब्बीर विरजी हा वसई परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे, प्रभारी पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सलमानखान पठाण, देवीदास लाब्दे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र शेडगे, धीरज कांबळे, पोलीस हवालदार घुगे, निंबाळकर, शिंदे, जुवाटकर, माने, निमसे, महिला पोलीस शिपाई सावंत, पोलीस शिपाई जाधव यांनी वसई येथे साध्या वेशात पाळत ठेवून शब्बीर विरजीला ताब्यात घेतले होते. तोच शब्बीर विरजी असल्याचे तपासात उघडकीस येताच त्याला पुढील कारवासाठी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले.
शब्बीरविरुद्ध एकूण 28 गुन्हे दाखल आहेत. त्यात माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात नऊ, कफ परेड पोलीस ठाण्यात अकरा, मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात पाच, चेंबूर, माणिक आणि गोव्याच्या परवरीम पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा गुन्ह्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.