चौदा वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी उत्तरप्रदेशातून अटक
जमिन मिळताच खटल्याच्या सुनावणीसाठी गैरहजर राहत होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
14 ऑक्टोंबर 2025
मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) – गेल्या चौदा वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीस रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी उत्तरप्रदेशातून अटक केली. शशिकुमार मातबर यादव असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. जामिनावर बाहेर येताच तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शिवडीतील लोकल कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी केले होते. अखेर चौदा वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
2011 रोजी रफि अहमद किडवाइ मार्ग पोलीस ठाण्यात 324, 323, 427, 452, 34 भादवी कलमांतर्गत एका गुन्ह्यांची नोंद केली होती. गुन्हा दाखल होताच शशिकुमारसह इतर काही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी लोकल कोर्टाने त्यांना जामिन मंजूर केला होता. त्यात शशिकुमार याचा समावेश होता. मात्र जामिनावर बाहेर येताच शशिकुमार हा मुंबईतून पळून गेला होता. तो खटल्याच्या प्रत्येक सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कोर्टाने अजामिनपात्र वॉरंट जारी करताना त्याच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश रफि अहमद किडवाई पोलिसांना दिले होते.
या आदेशाची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत शशिकुमारच्या अटकेसाठी एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती. या पथकाने तो राहत असलेल्या शिवडी परिसरात जाऊन त्याच्याविषयी जास्तीत जास्त माहिती काढण्यास सुरुवात केली होती. त्यातून पोलिसांना त्याच्याविषयी माहिती प्राप्त झाली होती. शशिकुमार हा मुंबईतून पळून गेल्यानंतर उत्तरप्रदेशात लपला असल्याची पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पालवी जाधव, महागवकर, सहाय्यक फौजदार सुरेश कडलग, पोलीस हवालदार माळवे, पोलीस शिपाई राठोड आदीचे एक पथक उत्तरप्रदेशात पाठविण्यात आले होते.
या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शशिकुमारला ताब्यात घेतले होते. चौकशीत तोच गेल्या चौदा वर्षांपासून वॉण्टेड असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. अटकेनंतर त्याला शिवडीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.