वॉटर किंगडमचे बोगस गिफ्ट व्हाऊचरची विक्री करुन फसवणुक
७२ लाखांच्या फसवणुकीप्रकरणी महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ सप्टेंबर २०२४
मुंबई, – बोरिवलीतील गोराई परिसरात असलेल्या वॉटर किंगडमचे बोगस गिफ्ट व्हाऊचरची छपाई करुन त्याची विक्री करुन व्योमन इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनीची चारजणांच्या टोळीने सुमारे ७२ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका महिलेसह चौघांविरुद्ध गोराई पोलिसांनी भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ओमप्रकाश पाल, मुकेश गाभा, संदीप चव्हाण आणि सोनाली अशी या चौघांची नावे असून या टोळीने गेल्या वर्षभरात ८७०० बोगस गिफ्ट व्हाऊचरची विक्री करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
विश्वास वासुदेव भुजबळ हे त्यांच्या कुटुंबियांसोबत मिरारोड येथे राहतात. गेल्या ३२ वर्षांपासून ते लोअर परेल येथील व्योमन इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत कामाला आहेत. त्यांच्या कंपनीचे वॉटर किंगडम, एस्सेलवर्ड आणि बर्डपार्क या करमणुकीच्या आस्थापना आहेत. १९९४ सालापासून ते बोरीवलीतील गोराई परिसरात असलेल्या वॉटर किंगडम येथे अकाऊंट विभागात मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या ठिकाणी असलेल्या सर्व कॅश काऊंटर लक्षण ठेवणे, सर्व आर्थिक व्यवहार पाहणे, जमा झालेली रक्कम तपासणे, जमा झालेले तिकिट आणि रक्कमेची पडताळणी करणे, जमा झालेली रक्कम बँकेत जमा करणे आणि संपूर्ण कामाचा रिपोर्ट त्यांच्या वरिष्ठांना देणे आदी त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांच्या वॉटर किंगडम या वॉटरपार्कचे एक दिवसांचे तिकिट १४५० रुपये आहे. या वॉटर पार्कला जास्तीत लोकांचा प्रतिसाद मिळावा, त्यातून कंपनीचा फायदा व्हावा यासाठी कंपनीने विविध आकर्षक योजना सुरु केल्या होत्या. त्यात गिफ्ट व्हाऊचर, पासपोर्ट, मेट्रो कार्ड आदी योजनांचा समावेश होता. ही योजना एक वर्षांसाठी असते.
दोन वर्षांपूर्वी कंपनीने अशाच विविध योजनेची सुरुवात केली होती. त्यासाठी कंपनीने मोठ्या प्रमाणात गिफ्ट व्हाऊचर बनविले होते. ते व्हाऊचर त्यांच्या अधिकृत एजंटला ९०० रुपयांना तर एजंटकडून अतिरिक्त शंभर आणि दोनशे रुपये आकारुन ते ग्राहकांना विकले जात होते. त्यामुळे कंपनीसह एजंटचा फायदा तसेच ग्राहकांना कमी दरात तिकिट मिळत असल्याने त्यांचाही फायदा होत होता. त्यासाठी कंपनीने कुर्ला येथील एक्सपर्ट इंटरप्रायझेज कंपनीकडून काही गिफ्ट व्हाऊचरची ऑर्डर देऊन छापून घेतली होती. त्यापैकी काही गिफ्ट व्हाऊचर त्यांच्या अधिकृत एजंटला देण्यात आले तर उर्वरित त्यांच्या मुख्य कार्यालयात पाठविण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांत कंपनीने १ लाख पाच हजार गिफ्ट व्हाऊचरची ऑर्डर देऊन ७७ हजार ५०० गिफ्ट व्हाऊचरचे वाटप केले होते. ऑगस्ट महिन्यांत त्यांच्या मोठ्या प्रमाणात कंपनीचे गिफ्ट व्हाऊचर प्राप्त झाले होते त्याचे सिरीयल क्रमांक नऊ आणि सात असे होते. या सर्व व्हाऊचरची तपासणी केल्यानंतर कोणीतरी कंपनीच्या बोगस गिफ्ट व्हाऊचर मार्केटमध्ये विक्री केल्याचे उघडकीस आले होते.
गेल्या काही महिन्यांत अशा प्रकारे ८७ हजार गिफ्ट व्हाऊरची विक्री करुन कंपनीची ७२ लाखांची फसवणुक करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकार्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशांनतर विश्वास भुजबळ व त्यांच्या टिमने चौकशी केली होती. चौकशीदरम्यान बोरिवली जेट्टी आणि भाईंदरच्या मॅक्सेस मॉल या ठिकाणी कमी किंमत बोगस गिफ्ट व्हाऊचर विक्री झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे तिथे जाऊन चौकशी केल्यानंतर त्यांना संबंधित गिफ्ट व्हाऊचर ओमप्रकाश पाल, मुकेश गाभा, संदीप चव्हाण आणि सोनाली या चौघांनी विक्री केल्याचे समजले. एप्रिल २०२४ रोजी या गिफ्ट व्हाऊचरची छपाई करुन नंतर विक्री करुन या चौघांनी कंपनीची सुमारे ७२ लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच विश्वास भुजबळ यांच्या वतीने गोराई पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर संबंधित चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी ३१८, ३३५, ३३६ (१), (२), (३), ३३८, ३४० (२), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून चारही आरोपींचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.