सर्टिफाईट ऑडिटरची फसवणुक केल्याप्रकरणी त्रिकुटास अटक
शेअरमध्ये चांगला परताव्याच्या आमिषाने 47 लाखांना गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
5 सप्टेंबर 2025
मुंबई, – राज्य शासनाच्या सहकार विभागाच्या सर्टिफाईट ऑडिटरची फसवणुक केल्याप्रकरणी एका त्रिकुटाला पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. ओवेश आसिफ शेख, जुनैद अब्दुल्ला शेख आणि हुसैन युसूफ शेख अशी या तिघांची नावे आहेत. पोलीस कोठडीनंतर या तिघांनाही शुक्रवारी वांद्रे येथील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावणी आहे. शेअरमार्केटमध्ये चांगला परतावा देतो असे सांगून या टोळीने तक्रारदाराची सुमारे 47 लाखांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
48 वर्षांचे तक्रारदार अंधेरीतील एस. व्ही रोड, केवणीपाडा परिसरात राहतात. ते राज्य शासनाच्या सहकारी विभागात सर्टिफाईट ऑडिटर म्हणून काम करतात. एप्रिल महिन्यांत त्यांचा मोबाईल क्रमांक वेंतुरा सिक्युरिटी लिमिटेड नावाच्या एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आला होता. त्यात शेअरमार्केटसंदर्भातील माहिती दिली जात होती. अनेकांनी कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुक केली होती, त्यात त्यांना चांगला फायदा होत होता. त्यामुळे त्यांनीही त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुक करावी. त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी कंपनीच्या सेबी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट पाठविले होते. त्यामुळे त्यांनी शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
6 एप्रिल ते 29 मे 2025 या कालावधीत त्यांनी विविध शेअरसाठी 47 लाख 72 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीनंतर त्यांना त्यांच्या गुंतवणुकीसह परतावा म्हणून 1 कोटी 45 लाख 67 हजार 145 रुपये जमा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी प्रॉफिटची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी सुमारे तीन लाख रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा झाले, मात्र वारंवार प्रयत्न करुनही त्यांना उर्वरित रक्कम ट्रान्स्फर करता आली नाही. त्यामुळे त्यांनी कंपनीच्या कस्टमर केअरशी संपर्क साधला असता संबंधित महिला त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होती. तुम्ही आधी टॅक्सची रक्कम भरा. ही रक्कम जमा केल्याशिवाय त्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर होणार नाही असे सांगत होती.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या मित्रांना ही माहिती सांगितली. यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांची फसवणुक झाल्याचे सांगून त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी घटनेला प्रकार सायबर हेल्पलाईनसह सायबर सेल पोलिसांना सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचात तपास सुरु असताना तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी ओवेश शेख, जुनैद शेख आणि हुसैन शेख या तिघांना ताब्यात घेतले होते.
तपासात या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. ते तिघेही विदेशात असलेल्या काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी विविध बँकेत खाती उघडले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा होत होती. ही रक्कम नंतर ते तिघेही सायबर ठगांना पाठवत होते. याकामी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने या तिघांनाही शुक्रवारी दुपारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.