सायबर गुन्ह्यांतील १.३१ कोटीची रक्कम वाचविण्यात यश
२४ तासांत आलेल्या तक्रारीनंतर सायबर सेलची उल्लेखनीय कामगिरी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – विविध आमिष दाखवून ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन सायबर गुन्ह्यांतील १ कोटी ३१ लाख रुपयांची रक्कम वाचविण्यात पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. गेल्या २४ तासांत आलेल्या विविध तक्रारीनंतर या अधिकार्यांनी तातडीने हालचाल करुन ही रक्कम संबंधित बँक खात्यात गोठविली, ती रक्कम तक्रारदारांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर होणार आहे. सायबर सेल पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह संबंधित तक्रारदाराकडून कौतुक होत आहे.
गेल्या काही वर्षांत ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. अशा सायबर ठगांपासून सावध राहण्याचे आवाहन तसेच सोशल मिडीयावर जनजागृती करुनही अज्ञात सायबर ठगांकडून विविध कारण सांगून फसवणुक होण्याचे प्रमाण कमी झाले नाही. गेल्या २४ तासांत अशाच काही तक्रारी पोलिसांना प्राप्त झाले होते. व्हॉटअपवर बोगस प्रोफाईल तयार करुन अज्ञात सायबर ठगांकडून संबंधित तक्रारदारांना पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. संबंधित तक्रारदाराची कोट्यवधी रुपयांची फसवणुक झाली होती. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी सायबर सेलच्या १९३० या हेल्पलाईन क्रमांक संपर्क साधून तक्रार केली होती. त्यात मरिनड्राईव्ह येथील एका खाजगी कंपनीची अज्ञात सायबर ठगाने सुमारे ८५ लाखांची फसवणुक केली होती तर इतर काही गुन्ह्यांत ४६ लाख ३३ हजार १२८ रुपयांची फसवणुक झाली होती. याबाबत तक्रारीची सायबर सेल पोलिसांना प्राप्त होताच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोीस आयुक्त लखमी गौतम, सहपोलीस आयुक्त शशिकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी गंभीर दखल घेत पश्चिम प्रादेशिक विभागाला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, बावस्कर, महिला पोलीस शिपाई माने, पाटील, पोलीस हवालदार राऊळ, महिला पोलीस हवालदार वालवलकर व अन्य पोलीस पथकाने तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्या बँकेशी संपर्क साधून त्यांच्या नोडल अधिकार्यांना संबंधित बँक खात्यातील सर्व व्यवहार थांबविण्याची विनंती केली होती. या विनंतीनंतर या बँक खात्यातील सर्व व्यवहार थांबविण्यात आले. बँक खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्यात आली होती. ही रक्कम आता संबंधित तक्रारदारांच्या बँक खात्यात पुन्हा ट्रान्स्फर करण्यात येणार आहे.