मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – हुंड्यावरुन होणार्या वादातून अंशकुमारी अरुणकुमार शर्मा या २६ वर्षांच्या महिलेची तिच्या पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना कफ परेड परिसरात घडली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी पतीला काही तासांत कफ परेड पोलिसांनी अटक केली. अरुणकुमार रामचंद्र शर्मा असे या आरोपी पतीचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना बुधवारी रात्री दिड ते तीनच्या सुमारास कफ परेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, शंकर भगवान मंदिराजवळील विठ्ठलवाडीतील दुसर्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक १०८ मध्ये घडली. कुंदनकुमार उपेंद्र शर्मा हा मूळचा औरंगाबादच्या बालगुंज बरंडी, कौडियारीचा रहिवाशी आहे. मृत अंशकुमारी ही त्याची बहिण आहे. २४ मे रोजी तिचे अरुणकुमारशी विवाह झाला होता. विवाहानंतर ती कफ परेड येथील तिच्या माहेरी आली होती. मात्र लग्नात हुंडा दिला नाही म्हणून अरुणकुमारला राग होता. याच कारणावरुन तो त्याची पत्नी अंशकुमारीचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता. तिला माहेरहून हुंडा आणण्यासाठी सतत दबाव आणून शिवीगाळ करुन मारहाण करत होता. तिच्या गरोदरपणातही त्याने तिला प्रचंड क्रुर वागणुक दिली होती. गेल्या काही महिन्यांपासून ती हुंडा आणत नाही म्हणून तो तिचा जास्त मानसिक व शारीरिक शोषण करत होता. मंगळवारी रात्री या दोघांमध्ये हुंड्यावरुन प्रचंड वाद झाला होता. या वादानंतर त्याने तिला बेदम मारहाण करुन तिची गळा आवळून हत्या केली होती. या हत्येनंतर तो प्रचंड घाबरला आणि घरातून पळून गेला होता.
ही माहिती स्थानिक रहिवाशांकडू समजताच कफ परेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अंशकुमारीला जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर तिच्या औरंगाबाद येथील कुटुंबियांना देण्यात आली होती. ही माहिती मिळताच तिचा भाऊ कुंदनकुमार शर्मा हा मुंबईत आला होता. त्याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत हुंड्यावरुन त्याची बहिण अंशकुमारीचा तिचा पती अरुणकुमार याच्याकडून सतत मानसिक व शारीरिक शोषण सुरु असल्याचे सांगितले. याच कारणावरुन त्याने तिची हत्या केली होती. त्यामुळे त्याच्या तक्रारीवरुन अरुणकुमार शर्मा याच्याविरुद्ध पोलिसांनी १०३ (१), ८०, ८५, ११५ (२), ३५२ भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या अरुणकुमार शर्मा याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला गुरुवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.