महागड्या वाईनची चोरी करुन ग्राहकांना स्वस्तात विक्री
चोरीसह फसवणुकप्रकरणी डिलीव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३१ जानेवारी २०२५
मुंबई, – वाईन शॉपमधून महागड्या वाईनची चोरी करुन परिचित ग्राहकांना स्वस्तात वाईनची विक्री करुन कंपनीची फसवणुक केल्याप्रकरणी दोन डिलीव्हरी बॉयविरुद्ध चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विकास मारुती चंदनशिवे आणि मेहबूब हुसैन शेख अशी या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध चोरीसह फसवणुकीच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. गेल्या महिन्यांभरात त्यांनी सुमारे साडेआठ लाखांच्या वाईनची चोरी करुन त्याची विक्री करुन आलेल्या पैशांचा अपहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
धर्मराज राजेंद्रप्रसाद सिंग हे कुर्ला येथे राहत असून मुंबई वाईन ऍण्ड ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून काम करतात. या कंपनीचे मुंबई शहरात ३४ वाईन शॉप असून त्यातील एक वाईन शॉप चेंबूर येथील आर. सी मार्ग, स्वामी जयरामदास शॉपिंग सेंटरमध्ये आहे. तिथे तीनजण मॅनेजर तर विकास, मेहूबब यांच्यासह आठजण डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतात. त्यांच्या प्रत्येक वाईन शॉपमध्ये स्कॅनिंग करुन वाईनची विक्री होते. मात्र डिलीव्हरी करताना संबंधित वाईनची काऊंटर स्कॅन होत नाही. महिन्यांच्या शेवटच्या दिवशी पुरवठा, विक्री झालेले आणि सध्या असलेल्या स्टॉकची माहिती काढून ती कंपनीला सादर केली जाते. या स्टॉकची तपासणी करताना काही अधिकार्यांना वाईन स्टॉकमध्ये तफावत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या अधिकार्यांनी संबंधित शॉपच्या स्टॉकची पुन्हा तपासणी सुरु केली होती. त्यात पुन्हा तफावत असल्याचे दिसून आले.
याबाबत स्टॉक मॅनेजरने त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकार्यांना सादर केला होता. यावेळी मॅनेजर करण सिंग यांनी डिलीव्हरी बॉयवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे काही डिलीव्हरी बॉयला कामावरुन कमी करण्यात आले होते. २४ जानेवारीला त्यांच्या शॉपमध्ये एका ग्राहकाने कॉल केला होता. त्याने त्याच्या दुकानातून सहा हजारची इंद्री वाईन तीन हजारामध्ये खरेदी केली होती, मात्र ते वाईन बॉटल डिलीव्हरी बॉय परत घेत नाही अशी तक्रार केलीद होती. त्यानंतर त्याने त्या वाईनचा फोटो व्हॉटअपवर पाठवला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मॅनेजरला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर डिलीव्हरी बॉय विकास चंदनशिवे याची चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्याने मेहबूबच्या मदतीने त्यांच्या परिचित ग्राहकांना स्वस्तात वाईन विक्री करुन या विक्रीतून आलेल्या पैशांचा अपहार केल्याची कबुली दिली.
१७ डिसेंबर २०२४ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीत या दोघांनी डिलीव्हरीच्या नावाने वॉईन शॉपमधून ८ लाख ५३ हजार रुपयांचे वाईन घेतले, त्याची ग्राहकांना स्वस्तात विक्री करुन पैशांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याची कबुली दिली. हा प्रकार उघडकीस येताच धर्मराज सिंग यांनी चेंबूर पोलीस ठाण्यात या दोन्ही डिलीव्हरी बॉयविरुद्ध तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीसह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे बोलले जाते.