क्षुल्लक वादातून पहिल्या पत्नीवर प्राणघातक हल्ला

विलेपार्ले येथील घटना; आरोपी पतीचे पलायन

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२९ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – क्षुल्लक वादातून सतत होणार्‍या भांडणाचा राग मनात धरुन मेरी कृष्णा पिल्लई या २९ वर्षांच्या महिलेवर तिच्याच पहिल्या पतीने तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना विलेपार्ले परिसरात घडली. या हल्ल्यात मेरी ही गंभीररीत्या जखमी झाल्याने तिला कूपर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पांडी शेट्टी या आरोपी पतीविरुद्ध जुहू पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

ही घटना मंगळवारी रात्री उशिरा एक वाजता विलेपार्ले येथील नेहरुनगर, रोड क्रमांक पाच, हॉटेल साईसनिधीसमोर घडल्याचे पोलिसांनी सांगितले. मेरी ही विलेपार्ले येथील व्ही. एम रोड, नेहरुनगरातील विश्‍वकर्मा चाळीत तिचा दुसरा पती कृष्णा पिल्लईसोबत राहत असून कॅटरिंगचे काम करते. तेरा वर्षांपूर्वी तिचे पांडी शेट्टीसोबत विवाह झाला होता. त्याच्यापासून तिला अकरा आणि नऊ वर्षांचे दोन मुले आहे. याच परिसरात पांडीचा हा इडली-डोसा विक्रीचा एक स्टॉल आहे. विवाहानंतर काही वर्षांनी त्यांच्यात कौटुंबिक वाद झाला होता. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून ती तिच्या मुलांसोबत वेगळी राहते. त्यांच्यात घटस्फोट झाला नव्हता. तरीही पांडीने राजेश्‍वरीशी तर मेरीने कृष्णा पिल्लईसोबत दुसरे लग्न केले होते. पांडी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्याविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यातून तो तिला आणि तिचा पती कृष्णासोबत क्षुल्लक वाद काढून वाद घालत होता.

मंगळवारी २७ फेब्रुवारीला मेरी ही तिच्या भावाला सोडण्यासाठी नेहरुनगर येथे आली होती. यावेळी तिथे असलेल्या पांडीने तिच्याशी विनाकारण शिवीगाळ करुन वाद घालून भांडण केले होते. मात्र त्याकडे तिने दुर्लक्ष केले होते. रात्री उशिरा ती तिच्या दोन्ही मुलांना बहिणीकडे सोडण्यासाठी गेली होती. यावेळी तिच्या मागावर असलेल्या पांडीने आधीच्या भांडणाचा राग काढून तिच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार केले. त्यात मेरी ही गंभीररीत्या जखमी झाली होती. त्यामुळे तिला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले. तिथेच तिच्यावर उपचार सुरु आहेत. ही माहिती मिळताच जुहू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पांडीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच पांडी हा पळून गेला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page