वर्क परमीट-व्हिसाच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक
राजस्थानच्या टुर्स कंपनीच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जून 2025
मुंबई, – वर्क परमीट आणि व्हिसासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन एका खाजगी कंपनीसह त्यांच्या उमेदवारांची फसवणुक झाल्याचा प्रकार मुलुंड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजस्थानच्या स्वातिक इमिग्रेशन टुर्स अॅण्ड ट्रॅव्हेल्स कंपनीचे मालक प्रितम सिंग याच्याविरुद्ध मुलुंड पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रितम त्याच्या राजस्थानमधील कंपनी बंद करुन पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पाोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मितल अमृतलाल टंक ही महिला मुलुंड येथे राहत असून एका खाजगी कंपनीत मॅनेजर म्हणून काम करते. ही कंपनीत शिक्षणासह नोकरीसाठी गरजू लोकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे, व्हिसासह नोकरी मिळवून देण्याचे काम करते. काही दिवसांपूर्वी मितल टंक हिला सोशल मिडीयावर राजस्थानच्या स्वास्तिक इमिग्रेशन या कंपनीची माहिती मिळाली होती. ही कंपनीही त्यांच्या ग्राहकांना व्हिसा देण्याचे काम करत होती. त्यामुळे तिने कंपनीचे मालक प्रितम सिंगशी संपर्क साधला होता. यावेळी त्याने तिला त्याची कंपनीत विविध देशाचे वर्क परमीट आणि व्हिसा देण्याचे काम करत असून त्यांचे चार्जेस कमी असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने प्रितमच्या कंपनीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला होता.
काही दिवसांनी तिने त्याला न्यूझीलंड, अब्लानिया, आर्यलँड या तीन देशाचे वर्क परमीट आणि व्हिसा मिळवून देण्याचे काही फाईल्स पाठविले होते. त्यानंतर त्याने तिला तिघांचे आर्यलँड देशाचे तीन ऑफर लेटर व्हॉटअप पाठविले होते. त्यामुळे तिला त्याच्यावर विश्वास बसला होता. त्यामुळे तिने त्याला 5 सप्टेंबर 2024 ते 5 मार्च 2025 या कालावधीत इतर उमेदवाराच्या व्हिसा आणि वर्क परमीटसाठी टप्याटप्याने साडेसात लाख रुपये पाठविले होते. मात्र त्याने कोणालाही वर्क परमीट, व्हिसा मिळवून दिला नाही. प्रितमला संपर्क साधला असता त्याचा संपर्क झाला नाही. राजस्थानच्या त्याच्या कंपनीत जाऊन पाहणी केल्यानंतर त्याची कंपनीत बंद असल्याचे दिसून आले.
अशा प्रकारे वर्क परमीट आणि व्हिसासाठ घेतलेल्या साडेसात लाखांचा अपहार करुन प्रितम सिंगने मितल टंक हिच्यासह विदेशात जाणार्या तिच्या उमेदवारांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच तिने मुलुंड पोलिसांत प्रितम सिंग याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु असून प्रितमच्या अटकेसाठी मुलुंड पोलिसांची एक टिम लवकरच राजस्थानला जाणार आहे. त्याने अशाच प्रकारे इतर काही उमेदवारांना वर्क परमीट आणि व्हिसा देतो असे सांगून गंडा घातल्याचे बोलले जाते.