मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
८ जुलै २०२४
मुंबई, – विदेशात नोकरीसाठी जाण्यासाठी इच्छुक असलेल्या लोकांना वर्क व्हिसा मिळवून देतो असे सांगून अनेकांना १ कोटी ६३ लाखांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रिना शहा आणि गौरव शहा या दोघांविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
सारिका विश्वनाथ धर्माधिकारी ही ४६ वर्षांची महिला मालाडच्या मालवणी पिरसरात राहते. तिला कॅनडा देशात नोकरीसाठी जायचे होते. त्यासाठी तिला व्हिसाची गरज होती. गेल्या वर्षी मे महिन्यांत तिची रिना आणि गौरव शहा यांची ओळख झाली होती. या दोघांचा मालाडच्या काचपाडा परिसरात द व्हिसा मेंशन नावाचे एक कार्यालय आहे. ते दोघेही विदेशात नोकरीसाठी जाण्यासाठी इच्छुक लोकांना व्हिसा देण्याचे काम करत होते. सारिका धर्माधिकारी हिला त्यांनी वर्क व्हिसा देण्याचे आश्वासन देत तिचा विश्वास संपादन केला होता. त्यसाठी तिने त्यांना सात लाख सोळा हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिला वर्क व्हिसा मिळवून दिला नाही. तसेच व्हिसासाठी घेतलेले पैसेही परत केले नाही. चौकशीदरम्यान तिला रिना आणि गौरव यांनी अनेकांना वर्क व्हिसा देतो असे सांगून त्यांच्याकडून १ कोटी ६३ लाख ८६ हजार ४०० रुपये घेतल्याचे समजले होते. मात्र कोणाालाही वर्क व्हिसा दिला नव्हता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने मालाड पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. तिच्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी रिना शहा आणि गौरव शहा या दोघांविरुद्ध ४०६, ४२०, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.