मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२९ जानेवारी २०२५
मुंबई, – वर्क व्हिसासह विदेशात नोकरीसाठी पाठवितो सांगून बेरोजगार तरुणांची सुमारे आठ लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार कांदिवलीतील चारकोप परिसरात उघडकीस आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध चारकोप पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संजय विश्वकर्मा आणि अब्दुल्ला हुसैन आलम शेख अशी या दोघांची नावे असून ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मोहम्मद हसन मोहम्मद गुलाब रसुल हे कर्नाटकचे रहिवाशी असून तिथेच मजुरीचे काम करतात. कांदिवलीतील चारकोप, केसर रेसीडेन्सीमध्ये एक कार्यालय आहे. या कार्यालयात बेरोजगार आणि गरजू लोकांना विदेशात नोकरीसाठी पाठविले जात असल्याची जाहिरात करण्यात आली होती. विदेशातील नोकरीसाठी वर्क व्हिसाची जबाबदारी कंपनीवर असल्याने त्यांच्याकडे अनेकांनी विदेशात नोकरीसाठी काम करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगून अर्ज केला होता. इतराप्रमाणे मोहम्मद हसन यांनी त्यांच्या मुलगा आणि जावयासाठी संजय विश्वकर्मा आणि अब्दुल हुसैनची भेट घेतली होती. नोकरीसह वर्क व्हिसासाठी त्यांनी त्याला चार लाख नऊ हजार रुपये दिले होते.
अशा प्रकारे त्यांनी इतर काही बेरोजगार तरुणांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतले होते. मात्र त्यापैकी कोणालाही वर्क व्हिसा मिळवून दिला नाही किंवा विदेशात नोकरीसाठी पाठविले होते. त्यामुळे मोहम्मद हसन व त्यांच्या परिचित लोकांनी त्यांची फसवणुक झाल्याची तक्रार चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संजय विश्वकर्मा आणि अब्दुल हुसैन या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत आलेल्या तक्रारीवरुन या दोघांनी सुमारे आठ लाखांची फसवणुक केली असली तरी त्यांनी अशाच प्रकारे इतर काही तरुणांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.