मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० सप्टेंबर २०२४
मुंबई, – वरळी आणि बोरिवलीतील दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तेरा वर्षांच्या विक्की सत्येंद्र कनोजिया या शाळकरी मुलासह कोस्टल रोडचा कामगार काश्मिर मिसा सिंग यांचा समावेश आहे. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग आणि वरळी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करुन दोन्ही चालकांना अटक केली आहे. राहिल हिमांशू मेहता आणि वैजीनाथ उपलवार अशी या दोघांची नावे आहेत. यातील राहिलची जामिनावर सुटका करण्यात आली तर वैजीनाथला शनिवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिंटूकुमार जातन ठाकूर हा मूळचा बिहारचा रहिवाशी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो त्याच्या सहकार्यासोबत कोस्टल रोड ठिकाणी वेल्डींग कामगार म्हणून कामाला आहे. एचसीसी कंपनीकडून कोस्टल रोडचे काम सुरु असून तिथे ८० कामगार कामाला आहे. त्यांच्यासाठी वरळीतील जिजामाता, गांधीनगर परिसरात राहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी तिथे विश्वकर्माची पूजा होती. त्यामुळे सर्व कामगार सोमवारीच वरळी दूध डेअरीसमोर मंडप बांधण्याचे काम करत होते. सायंकाळी सव्वासात वाजता काश्मिर मिसा सिंग हा तिथे काम करत होता. यावेळी कोस्टल रोडच्या साऊथ बॉंण्डच्या नार्थ बॉण्डवर वाहतूक सुरु होती. काही वेळानंतर भरवेगात जाणार्या एका बीएमडब्ल्यू कारने काश्मिर सिंगला जोरात धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याला जवळच्या शासकीस हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. अपघाताला जबाबदार असलेल्या कारचालक राहिल हिमांशू मेहता याला पोलिसांनी अटक केली. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तपासात राहिल हा नारायण दाभोळकर मार्ग, बेनहर अपार्टमेंटचा रहिवाशी असून व्यवसायाने हिरे व्यापारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुसरी घटना बोरिवली परिसरात घडली. बहिणीसोबत शाळेत जाणार्या एका तेरा वर्षांच्या शाळकरी मुलाला भरवेगात जाणार्या डंपरने धडक दिली. या अपघातात विक्की सत्येंद्र कनोजिया या मुलाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी हलगर्जीपणाने डंपर चालवून एका तेरा वर्षांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून वैजीनाथ उपलवार या चालकास अटक केली. विक्की हा बोरिवलीतील कार्टर रोड क्रमांक तीन परिसरात त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. याच परिसरातील एका शाळेत तो सातवीत शिकत होता. शुक्रवारी दुपारी सव्वाबारा वाजता तो त्याच्या बहिणीसोबत शाळेत जाण्यासाठी घरातून निघाला. यावेळी रस्त्यावरुन जाणार्या एका डंपरने त्याला धडक दिली. डंपरच्या चाकाखाली आल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच डंपरचालकास पोलिसांनी अटक केली. त्याला शनिवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. विक्कीच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.