बोगस भाडेकरार तयार करुन वयोवृद्ध गिरणी कामगाराची फसवणुक

महिलेसह दोन एजंटाविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ जानेवारी २०२५
मुंबई, – बोगस भाडेकरार तयार करुन एका वयोवृद्ध गिरणी कामगाराची तीनजणांच्या टोळीने फसवणुक केल्याचा प्रकार वरळी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेसह दोन एजंट अशा तिघांविरुद्ध वरळी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अनिल मुळीक, सुधीर वायंगणकर आणि पूनम भोसले अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांना लवकरच चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.

६८ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार दत्तात्रय जानू अंगज हे कोल्हापूरच्या कागल, मुरगुडच्य अवचितवाडीचे रहिवाशी आहे. ते भारत मिलमध्ये गिरणी कामगार म्हणून कामाला होते. त्यामुळे चार वर्षांपूर्वी त्यांना म्हाडाकडून गिरणी कामगारासाठी आलेल्या इमारतीमध्ये एक फ्लॅट मिळाला होता. वरळीतील गणपतराव मार्ग, भारत मिल सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीच्या बावीसाव्या मजल्यावरील २२०३ क्रमांक हा त्यांच्या मालकीचा फ्लॅट आहे. या फ्लॅटवर मिळकत मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांचा मित्र शंकर सकपाळ यांनी एजंट म्हणून काम करणार्‍या अनिल मुळीक आणि सुधीर वायंगणकर यांच्याशी ओळख करुन दिली होती. या दोघांनी त्यांचा विश्‍वास संपादन करुन संबंधित मिळकत मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्याकडून फ्लॅटचे मूळ कागदपत्रे, लाल पास, भारत मिलचे ओळखपत्रे, विमा कार्ड, फंड पावती, म्हाडाचे अलोटमेंट लेटर आदी कागदपत्रे घेतले. ते कागदपत्रे म्हाडा कार्यायात जमा करुन साडेनऊ लाख रुपये जमा केले. त्यानंतर त्यांनी फेब्रुवारी २०२० रोजी त्यांना फ्लॅटची चावी दिली होती. चावी दिल्यानंतर त्यांनी त्यांना या फ्लॅटमध्ये भाडेकरु मिळवून देऊन त्यांना आर्थिक मदत करण्याचे आश्‍वासन दिले होते.

दत्तात्रय अंगज हे कायमस्वरुपी त्यांच्या कोल्हापूर येथील गावी राहणार असल्याने त्यांनीही त्यांना होकार दिला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅटची चावी देऊन गावी निघून गेले होते. याच दरम्यान या दोघांनी त्यांना भाड्यापोटी चार लाख साठ हजार रुपये दिले आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांनी त्यांची ओळख पूनम भोसलेशी करुन दिली होती. ती त्यांच्या फ्लॅटमध्ये भाडेकरु म्हणून राहणार होती. त्यामुळे त्यांच्यात पंधरा लाख रुपये डिपॉझिट आणि पंचवीस हजार रुपये भाडे देण्याचे ठरले होते. चर्चेनंतर त्यांच्यात ९ फेब्रुवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२८ असा पाच वर्षांचा करार झाला होता. करारानंतर तिने त्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करते असे सांगितले होते. त्यामुळे त्यांनी करारावर स्वाक्षरी केली नव्हती. काही दिवसांपूर्वी ते त्यांच्या गावी निघून गेले. मात्र पूनमसह अनिल आणि सुधीर यांनी त्यांच्या बँक खात्यात डिपॉझिटसह भाड्याची रक्कम ट्रान्स्फर केली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर अनिल आणि सुधीर हे दोघेही त्यांना विविध कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होते. जुलै २०२४ ते मुंबईत आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या फ्लॅटमध्ये अशिमा आचार्य ही तरुणी एकटीच राहत असल्याचे दिसून आले. याबाबत तिच्याकडे विचारणा केली असता तिने पूनम भोसलेसोबत फ्लॅटचा करार केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

अनिल, सुधीर आणि पूनम यांनी २०१८ ते जुलै २०२४ या कालावधीत त्यांचा विश्‍वास संपादन करुन त्यांचे सर्व कागदपत्रे स्वतकडे ठेवून, बोगस करार करुन पंधरा लाखांच्या डिपॉझिटसह दरमाह देण्यात आलेल्या भाड्याचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वरळी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अनिल मुळीक, सुधीर वायंगणकर आणि पूनम भोसले या तिघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page