मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२ जानेवारी २०२५
मुंबई, – सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी आणलेल्या ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांनी ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या घाटकोपर आणि वरळी युनिटच्या अधिकार्यांनी पकडला. याच गुन्ह्यांत दोन नायजेरीयन नागरिकासह चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी कोकेन, एमडी आणि कोडेन बॉटल्स असा १ कोटी ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नयुम शेख, संजीब सरकार, मोहम्मद बाष्टिस्टा आणि फेथ इग्नीबोसा अशी या चौघांची नावे असून यातील मोहम्मद आणि फेथ हे दोघेही नायजेरीयन नागरिक आहेत. अटकेनंतर चारही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. वर्षांच्या पहिल्याच दिवशी ड्रग्ज तस्करांना मुंबई पोलिसांनी चांगला दणका दिला आहे.
थर्स्टी फर्स्टच्या पार्टीसाठी मुंबई शहरात कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे ड्रग्जची तस्करी करणार्या आरोपींविरुद्ध मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना गोवंडीतील देवनार परिसरात काहीजण कोडेन फॉस्फेटमिश्रीत बॉटल्सची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून नयुम शेख या २८ वर्षांच्या तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ९०० कोडेनमिश्रीत बॉटल्सचा साठा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे साडेचार लाख रुपये इतकी आहे.
अशाच दुसर्या कारवाईत घाटकोपर पोलिसांनी कोकेन विक्रीसाठी कुर्ला परिसरात आलेल्या संजीब सरकार या ४० वर्षांच्या आरोपीस अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी ३९६ ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत १ कोटी १८ लाख ८० हजार आहे. हा मुद्देमाल जप्त केल्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली.
तिसर्या कारवाईत वरळी युनिटच्या अधिकार्यांनी दोन नायजेरीयन नागरिकांना अटक केली. आग्रीपाडा परिसरात काहीजण एमडी ड्रग्जची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. यावेळी पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून मोहम्मद बाष्टिस्टा आणि फेथ इग्नीबोसा या दोघांना अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ४२ लाख ५० हजाराचा १७० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. अशा प्रकारे तिन्ही कारवाईत पोलिसांनी ३९६ ग्रॅम वजनाचे कोकेन, १७० ग्रॅम वजनाचे एमडी आणि ९०० कोडेनमिश्रीत बॉटल्स असा १ कोटी ६५ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त शाम घुगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले आणि वरळी युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे यांनी केली.
२०२४ साली मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलने ड्रग्जसंबंधित ९३ गुन्हे दाखल केले आहे. या गुन्ह्यांत १८४ ड्रग्ज तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून ३४९२ किलो ८७६ ग्रॅम वजनाचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या ड्रग्जची किंमत ६० कोटी ६३ लाख रुपये इतकी आहे.