वरळी हिट ऍण्ड रनची वरळी पोलिसांकडून पुन्हा रिक्रिशन

मिहीरने मद्यप्राशन केल्याचे उघड; कारचालकाला न्यायालयीन कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ जुलै २०२४
मुंबई, – वरळीतील ऍनी बेझंट रोडवर रविवारी पहाटे झालेल्या हिट ऍण्ड रन घटनेची वरळी पोलिसांकडून गुरुवारी सकाळी पुन्हा रिक्रिशन करण्यात आले होते. यावेळी अपघाताच्या वेळेस उपस्थित तसेच सध्या पोलीस कोठडीत असलेला मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा आणि त्याचा कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत हे दोघेही उपस्थित होते. या दोघांनी तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून कशा प्रकारे अपघात झाला आणि त्यानंतर त्यांनी काय काय केले याची माहिती दिली. दरम्यान याच गुन्ह्यांत अटकेत असलेल्या राजऋषीची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला गुरुवारी दुपारी शिवडीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रविवारी पहाटे मरिनड्राईव्हला जाताना मिहीरने दारुच्या नशेत वरळी येथे एका बाईकस्वाराला धडक दिली होती. या धडकेने त्याने बोनेटवर पडलेल्या कावेरी प्रदीप नाखवा या महिलेला दिड किलोमीटरपर्यंत फरफरत नेले होते. पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याने तिच्या अंगावर कार नेली होती. त्यात कावेरी नाखवा हिचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर ते दोघेही कलानगरच्या दिशेने पळून गेले होते. तपासात घडलेला प्रकार या दोघांनी सांगितला. त्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा त्याच वेळेस वरळी पोलिसांनी या दोघांनाही घटनास्थळी आणले होते. तिथे घटनेचा पुन्हा रिक्रिशन करण्यात आले होते. बुधवारी मिहीरने अपघाताच्या वेळेस तो कार चालवत असल्याची कबुली देताना मद्यप्राशन केला नसल्याचा दावा केला होता. मात्र रिक्रिशनच्या दरम्यान मिहीर हा दारुच्या नशेत असल्याचे उघडकीस आले. तशी कबुलीच त्याने आता पोलिसांना दिली आहे. त्यापूर्वी मिहीर आणि राजऋषी यांची वरळी पोलिसांकडून समोरासमोर चौकशी करण्यात आली होती. यावेळी या दोघांनी संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना सांगितली. घरातून निघाल्यापासून जुहूच्या बारमध्ये जाऊन मद्यप्राशन करणे, मरिनड्राईव्ह जाताना वरळीतील अपघातापासून संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर त्यांना पुन्हा घटनास्थळी नेण्यात आले होते. दुसरीकडे पोलीस कोठडीत असलेल्या राजऋषी याची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला गुरुवारी दुपारी पुन्हा शिवडीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी वरळी पोलिसांकडून त्याच्या आणखीन पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र ही मागणी कोर्टाने फेटाळून लावून त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याला पोलीस बंदोबस्तात कारागृहात पाठविण्यात आले होते.

आतापर्यंतच्या तपासात जुहूच्या विस ग्लोबल बारमध्ये मद्यप्राशन करुन मिहीर शहा हा रात्री उशिरा त्याच्या मित्राच्या कारमधून बोरिवलील घरी गेला होता. घरी गेल्यानंतर त्याने राजऋषी बिदावतला मरिनड्राईव्हला जायचे आहे असे सांगून घरातून निघाला. यावेळी त्याने मालाड येथे चार बिअरच्या टिन घेतल्या होत्या. कारमध्येच त्याने बिअर प्यायाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यावेळी मद्यधुंद अवस्थेत मिहीर हा कार चालवत होता, वरळी येथे आल्यानंतर त्याने एका बाईकला धडक दिली. या धडकेनंतर प्रदीप नाखवा व त्यांची पत्नी कावेरी नाखवा हे दोघेही त्याच्या बोलेटवर पडले. काही वेळानंतर प्रदीप हे खाली पडले, त्याला कावेरी हीदेखील खाली पडली असावी असे वाटले. अपघातामुळे तो प्रचंड घाबरला होता, त्यामुळे त्याने कार सुसाट वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला, मात्र दिड किलोमीटर अंतर पार गेल्याने त्याला कावेरी कारच्या खाली फरफटत पुढे आल्याचे लक्षात आले. त्यामुळे बोनेट व टायरच्या मध्ये अडकलेल्या कावेरीला बाहेर काढून त्यांनी रस्त्यावर टाकले. त्यानंतर पळून जाताना त्यांनी पुन्हा कार तिच्या अंगावरुन नेली होती. दारुच्या नशेत हा अपघात झाला असून आपण जाणूनबुजून कावेरीचा मृत्यू व्हावा या उद्देशाने कार तिच्या अंगावर नेली नाही असे मिहीर शहाने तपासादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.

राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍यांच्या चौकशीत राजेश शहा याच्यासह त्याच्या मित्रांकडे बारमध्ये मद्यप्राशन करताना परवाना नव्हता. तरीही मिहीरने काही पेग रिचवले होते. नियमानुसार बारमध्ये मिहीरला वयाबाबत विचारणा करण्यात आली होती, मात्र त्याने त्याच्या वयाबाबत दिशाभूल केल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. शनिवारी रात्री उशिरा मिहीर हा त्याच्या मित्रासोबत जुहूच्या विस ग्लोबल बारमध्ये गेला होता. यावेळी मिहीरसह त्याच्या मित्रांना वयाबाबत विचारणा करण्यात आली होती. नियमानुसार २१ ते २५ वयोगटातील तरुणांना माईल्ड बिअर पिण्यास परवानगी आहे. त्यांना हार्ड ड्रिंक घेता येत नाही. मात्र त्यांनी चुकीची माहिती देऊन बार कर्मचार्‍यांना व्हिस्कीची ऑर्डर दिल्याचे बोलले जाते. मद्यप्राशन करताना त्यांच्यापैकी कोणाकडे मद्य परवाना नव्हता. त्यांनी मद्य परवाना न घेताच पेग रिचवल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

बारचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजची शहानिशा सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या प्रकरणात नियमांचे उल्लघंन झाल्याचे उघडकीस आल्यास बारमालकावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कावेरी प्रदीप नाखवा यांचा मृत्यू अपघाती असल्याचा असला तरी सीसीटिव्ही फुटेजवरुन मिहीर शहा आणि राजऋषी बिदावत यांनी पळून जाताना तिला कारमधून चिरल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सध्या तरी अपघाताच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवून वरळी पोलिसांनी तपास सुरु आहे. या गुन्हयांचा तपास सुरु असून लवकरच तपासाचा अंतिम अहवाल वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना सादर केला जाणार आहे. त्यानंतर हत्येच्या कलमांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page