मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
९ ऑगस्ट २०२४
मुंबई, – वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणात आता नवीन खुलासा झाला आहे. मद्यप्राशन करुन अपघात घडविल्याचा आरोप असलेला मुख्य आरोपी मिहीर राजेश शहा याने अपघाताच्या वेळेस मद्यप्राशन केले नव्हते असे त्याच्या रक्त आणि लघवीच्या नमून्यातून उघडकीस आले आहे. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून हा रिपोर्ट वरळी पोलिसांना प्राप्त झाला आहे. या रिपोर्टमुळे वरळी पोलिसांच्या तपासावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
७ जुलैला वरळी येथे मद्यप्राशन करुन बीएमडब्ल्यू कार चालविताना मिहीरने एका बाईकस्वाराला धडक दिली होती. बाईकवरील महिलेला बोनेटवरुन दिड किलो फरफरत नेऊन नंतर तिच्या अंगावर कार नेली होती. या अपघातात कावेरी प्रदीप नाखवा या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच मिहीरचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पालघर जिल्ह्याचे उपनेते राजेश दामजी शहा यांच्यासह त्यांचा कारचालक राजऋषी राजेंद्रसिंह बिदावत या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत राजेशची जामिनावर सुटका करण्यात आली तर राजऋषीला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले होते. मात्र अपघातानंतर मिहीर हा पळून गेला होता. अखेर तीन दिवसांनी मिहीरला विरार येथून पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर मिहीरने अपघाताच्या आपण मद्यप्राशन केले नव्हते असे सांगितले होते, मात्र दुसर्या दिवशी त्याने मद्यप्राशन करुन कार चालविल्याची कबुली दिली. त्याचा हा कबुलीजबाब पोलिसांनी व्हिडीओ रिकॉडिंगही केला होता.
अपघातापूर्वी मिहीर हा त्याच्या चार मित्रांसोबत जुहूच्या बीस ग्लोबल या बारमध्ये गेला होता. तिथे त्याने त्याच्या मित्रांसोबत मद्यप्राशन केले होते. बारचे सीसीटिव्ही फुटेज आणि डिव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या फुटेजमधून मिहीर हा बारमध्ये त्याच्या मित्रांसोबत आला होता. बारचे अठरा हजाराचे बिल त्याने दिले होते. ते बिल त्याने सोशल मिडीयावर अपलोड केले होते. बारमधून बाहेर जाताना तो फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यानंतर त्याने पुन्हा बिअर शॉपमध्ये चार बिअरचे टिन घेतले होते. मरिनड्राईव्ह येथे लॉंग ड्राईव्हसाठी जाताना त्याने कार चालविताना बिअर प्यायल्याचे सांगितले होते. मिहीरच्या कबुलीनंतर त्याचा कार चालविण्याचा रद्द करावा यासाठी पोलिसांनी आरटीओशी पत्रव्यवहार केला होता. दुसरीकडे अटकेनंतर त्याच्या रक्ताचे आणि लघवीचे नमूने घेण्यात आले होते. ते फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट वरळी पोलिसांना प्राप्त झाला असून त्यात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
हा रिपोर्ट लवकरच वरळी पोलिसाकडून लोकल कोर्टात न्यायालयात सादर केला जाणार आहे. अपघातानंतर पळून गेलेल्या मिहीरने रक्त आणि लघवीच्या नमून्यात मद्यप्राशन केल्याचे उघडकीस येऊ नये म्हणून पुरेपुरे काळजी घेतली होती. त्यामुळे त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे बोलले जाते. यापूर्वी कोर्टात नेताना वरळी पोलिसांवर मिहीरला विशेष ट्रिटमेंट झाल्याचा आरोप झाला होता. त्याचा त्याचा अल्कोहोलचा रिपोर्टच निगेटिव्ह आल्याने वरळी पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.