मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० जानेवारी २०२५
मुंबई, – चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या मुलीचा अपहरणाचा तीन तासांत छडा लावून वरळी पोलिसांनी अपहरण करणार्या एका महिलेस अटक केली. तिच्या तावडीतून तीन वर्षांच्या मुलीची सुटका करुन तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. दिपाली बबलू दास असे या महिलेचे नाव असून तिच्या नातीसोबत खेळता येत नसल्याने तिने तिच्याच वयाच्या मुलीचे अपहरण केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
पूनम विनोदकुमार गुप्ता ही महिला वरळीतील प्रेमनगर परिसरात राहते. २९ जानेवारीला दुपारी साडेबारा वाजता ती तिच्या घरात काम करत होती. यावेळी तिची तीन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत होती. काही वेळानंतर तिथे एक महिला आली आणि तिने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून तिला गल्लीतून बाहेर नेले होते. हा प्रकार मायनुर अबरार अहमद खान या मुलाच्या लक्षात येताच त्याने पूनम गुप्ता हिला ही माहिती दिली. या माहितीनंतर तिने तिच्या मुलीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. त्यामुळे भयभीत झालेल्या पूनमने वरळी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. या अपहरणाच्या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरळी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल रुपवते, भालेराव महिला पोलीस उपनिरीक्षक उषा मस्कर, पोलीस शिपाई सावकार, घुगरे, खाडे, पाटील, एटीएसचे पोलीस हवालदार परब, कुंभार, पोलीस उपनिरीक्षक आळंदे, महिला पोलीस शिपाई खाके, गावडे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक या पथकाने अवघ्या तीन तासांत दिपाली दास या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत तिनेच या मुलीचे अपहरण केल्याचे सांगून तिचा ताबा पोलिसांकडे सोपविला. तपासात दिपाली ही मूळची कोकलता येथील मेदीनीपूर, दासपूरची रहिवाशी असून सध्या वरळीतील प्रेमनगर परिसरात असून पेशंट सांभाळण्याचे काम करते. तिनेच या मुलीचे अपहरण करुन तिच्या घरी आणले होते.
अपहरणाच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. तपासात दिपालीची विवाहीत मुलगी कोलकाता येथे राहत असून तिला एक तीन वर्षांची मुलगी आहे. तिच्यासोबत राहता येत नाही, खेळता येत नाही याची तिला सतत खंत वाटत होती. नातीसारख्या मुलीसोबत वेळ घालवता यावा, तिच्यासोबत खेळता यावे, तिच्यासोबत दिवसभर वेळ घालविता यावा यासाठी तिने या मुलीचे अपहरण केले होते. मात्र या मुलीचे अपहरण करणे तिच्या चांगलेच अंगलट आले. तिच्या राहत्या घरातून या मुलीची पोलिसांनी सुटका केली. त्यानंतर तिला तिच्या पालकांकडे सोपविण्यात आले होते.