म्हाडा रुमच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फसवणुक

33 लाखांना गंडा घालणार्‍या भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
4 डिसेंबर 2025
मुंबई, – गिरणी कामगाराला अलोट झालेल्या वरळीतील श्रीनिवास मिल अपार्टमेंटमधील म्हाडाचा रुम देण्याची बतावणी करुन एका वकिलाची सुमारे 33 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नवीन नाथा गायकवाड या भामट्याविरुद्ध विनोबा भावे नगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्यांत नवीनची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्याने म्हाडा रुमच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे.

नितीन बाजीराव शिंगटे हे व्यवसायाने वकिल असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत कुर्ला परिसरात राहतात. कुर्ला येथील लोकल कोर्टासमोरच त्यांचे एक खाजगी कार्यालय आहे. तिथे कामानिमित्त आलेल्या महेंद्र हडकर यांच्याशी त्यांची ओळख झाली होती. त्यांनी त्यांची ओळख राजू राठोडशी करुन दिली होती. चार वर्षापूर्वी राजूने त्यांना एका मिल कामगाराची रुम असून जर रुम विकत घ्यायची असेल तर तो त्यांना सर्व पेपर बनवून देण्याचे आश्वासन दिले होते. या रुमची फाईल नवीन गायकवाड याच्याकडे असल्याचे सांगितले होते.

या रुमसाठी नितीन शिंगटे हे इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी नवीन गायकवाड याची भेट घेतली होती. त्याने वरळी येथील श्रीनिवास मिल या ठिकाणी बाळकृष्ण विठू मयेकर यांना म्हाडाकडून एक रुम मिळणार आहे. त्याचे निधन झाले असून त्यांची वारस विवाहीत मुलगी स्वाती हरिश्चंद्र कांबळे हिच्या नावे ही रुम होणार आहे. ती रुम त्यांना देणार असून सर्व कागदपत्रे कायदेशीर बनवून देणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी बालकृष्ण मयेकर यांच्या रुमचे म्हाडाकडून मिळालेले अलोटमेंट लेटर, त्यांचा मृत्यूचा दाखला, वारसदार स्वाती कांबळे हिचा आधारकाड, मिलचे सर्व्हिस सर्टिफिकेटचे झेरॉक्स प्रत दाखविले होते.

त्यांच्यात रुमचा 37 लाख 50 हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला होता. यावेळी त्यांच्यात पार्ट पेमेंटचे अ‍ॅग्रीमेंट ऑफ सेल बनविण्यात आले होते. या करारानंतर नितीन शिंगटे यांनी पंधरा लाख धनादेश तर अठरा लाख रुपये कॅश स्वरुपात असे 33 लाख रुपये दिले होते. हा संपूर्ण व्यवहार महेंद्र हडकर आणि राजू राठोड यांच्या समक्ष झाला होता. या पेमेंटनंतर नवीनने त्यांना दिड महिन्यांत रुमचा ताबा देण्याची हमी दिली होती. रुमचा ताबा मिळताच उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते. मात्र दोन ते तीन उलटूनही नवीनने त्यांना रुमचा ताबा दिला नाही. कॉल केल्यानंतर तो त्यांना प्रतिसाद देत नव्हता.

हा प्रकार संशयास्पद वाटताच ऑगस्ट 2025 रोजी ते स्वत श्रीनिवास मिल येथील फ्लॅटची पाहणीसाठी गेले होते. यावेळी तिथे त्यांना ती राजभोज या व्यक्तीची असल्याचे तसेच त्याने त्याच्या रुममध्ये एक भाडेकरु ठेवल्याचे दिसून आले. या प्रकाराने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी नवीन गायकवाडकडे विचारणा केली होती. त्यांच्यातील रुमचा व्यवहार रद्द करुन त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती.

मात्र त्याने रुमसाठी घेतलेल्या सुमारे 33 लाखांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी विनोबा भावे नगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नवीन गायकवाड याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page